अंधार बोलतो

अंधार बोलतो
अंधार बोलतो
तेव्हा सांगतो
माणूस डोळे मिटून करतो
त्या विचारांच्या गोष्टी

तो सांगतो
मद मत्सराच्या गोष्टी
तेव्हा डोळ्यांना टोचतो
तो सांगतो अपार शांततेच्या
आणि थकल्या गात्रांच्या गोष्टी
तेव्हा मऊसूत दुलई बनून कुशीत घेतो

कधी सांगतो
भुताखेतांच्या गोष्टी
तेव्हा तो अचानक गूढ होतो
कधी भरगच्च अंधारात
वादळी पावसाच्या गोष्टी ऐकाव्यात
कधी एकाकी गरम झळांपासून
लपायला वापरावा अंधार
आणि अशा अंधारात शेजारी झोपलेल्यावर
ठेऊ नये विश्वास

भुतंखेतं साधीसुधी
वाटते मद मत्सराची भिती
सांगतो अंधार
राग, लोभ अन वासनेनं
उगाच मला बदनाम केलंय
माझा फायदा घेऊन
कुणाचा खून होताना
माझ्यावर उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्या
लपवायला मला पुन्हा अंधारच वापरावा लागतो

अंधार बोलतो
अंधार बोलतो तेव्हा रडतो
मीच आता अंधाराला कुशीत घेऊन झोपतो

12:29am
25 sep 14

यावर आपले मत नोंदवा