Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट

धनन धनन धन एकसारखा गुंजणारा आवाज. जड झालेले श्वास. अनियमित. डोक्यात अपयशाचं भय. डोक्यात ड्रम बडवल्यासारखं. मुंबईत असह्य उकडू लागलंय परत. दूर रस्त्यावरून वेगाने जाणार्‍या वाहनांची भिती वाटते. पलंगावर पडल्या पडल्या भिनतो तो वेग रक्तात. आणि मग अशक्य होतं झोपणं. फुल स्पीडवर फिरणार्‍या फॅनखालीही कपाळावर घाम साचू लागतो. घाबरून डोळे बंद करावे तरी जाणवते ती फक्त आग. कसलातरी personal paradigm shift करायची. धनन धनन धन र्‍हिदम वाढत राहतो. आणि बंद डोळ्यात आग.

आजकाल हे रातकिडे डंपर ट्रकसारखा आवाज का करतात? रात्री कुत्री भुंकत नाहीत, रडतात. कानांचं आणि डोक्याचंही फुकटात वाभाडं. मी रात्री झोपल्यावर खोलीतला अंधार आणि रस्त्यावरच्या ट्यूबलाईट्सचा प्रकाश घनघोर युद्ध वगैरे करतात का? त्या युद्धाचं पुढे काय होतं? बहूतेक प्रकाश जिंकत असावा. सकाळी उठताना अंधाराचा मागमूसही नसतो आणि रात्रभर छान झोपूनही थकल्यासारखंच वाटत असतं मला उठल्या उठल्या. कदाचित हरलेला अंधार माझ्यात वस्तीला येत असावा दिवसभरासाठी…… तरीच… तरीच अंधाराची इतकी भिती वाटते.

आजकाल आजूबाजूला फार गर्दी झाली की अंधारल्यासारखं होतं. कधीतरी एकटा असलो तर बरं वाटतं, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यासारखं. लहानपणी माझे पणजोबा असं अंगणात आरामखुर्चीत पेपर वाचत पडलेले पाहिलेत मी… उन खात. उन जितकं कोवळं तितकीच त्यांची कोकणस्थी अंगकांती गोरी दिसायची. उन चढलं की ते रोगट पिवळे दिसू लागत; पहायलाही त्रास होई त्यांच्याकडे. मग ते घरात येत. बाहेर पिवळेशार दिसणारे माझे पणजोबा घरात आल्या आल्या असे काळेकभिन्न का होत हे कोडं मला तेव्हा सुटायचं नाही. आता येतंय लक्षात, त्याचा संबंध अंधाराशी होता!

मुंबईत आल्यापासून कावळा या एकमेव पक्ष्याची ओळख उरली आहे. कबूतरांशीही ओळख आहे. पण कबूतरखान्याच्या गलेलठ्ठ कबूतराकडे त्या दादरच्या फ्लायओव्हरखाली झोपणारे कुपोषित भिकारी ज्या नजरेने बघतात ती नजर मला मुळीच सहन होत नाही. म्हणून कबूतरांवर राग आहे माझा. हे थांबवण्यासाठी मी भिकार्‍यांची भूक भागवू शकत नाही आणि कबूतरांनाही मारू शकत नाही. कबूतरांशी ओळख न दाखवतानासुद्धा नजरेत फक्त असहाय्यता असते. त्यांचे हिरवेकंच डोळे, तुकतुकीत पिसं, हास्यास्पद घाबरटपणा कसलंच अप्रूप वाटत नाही. कावळा मात्र आवडतो. अंधारासारखा तो ही काळाच. अंधाराचाच चुकार दूत.

करता येईल मला personal paradigm shift?

वि.सू:
paradigm  [par-uh-dahym, -dim]
–noun
a set of forms all of which contain a particular element, esp. the set of all inflected forms based on a single stem or theme.

Advertisements

2 thoughts on “Personal Paradigm Shift- पर्सनल पॅराडाईम शिफ्ट”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s