व्हेनिसचा बोटवाला

तो व्हेनिसच्या असंख्य कालव्यांमधून पर्यटकांना फिरवायचा. मुख्यत्वे प्रेमी जीवांच्या जोड्याच. सुंदर व्हेनिस, तितक्याच सुंदर मुली आणि थंड दमट वातावरणातच साकळून राहिलेला रोमान्स ह्या सगळ्यात तो मात्र दिवसभर वल्ही चालवत चालवत थकून जायचा. रात्री थकून बिछान्यावर पडलं की त्याला स्वप्न पडायची ती ही बोट उलटून पाण्यात पडण्याची. की मग रात्रभर झोपेचे वांधे. मग तो सरळ उठायचा आणि बोटीत जाऊनच झोपायचा.

हा बोटवाला जसा एकटा असायचा तशीच ती ही एकटी असायची. ती फुलवाली होती. फ्लोरिस्ट खरंतर. रंगीबेरंगी ऑर्किड्सचे सुंदर गुच्छ करायची. आणि विकायची. आज दोघांनाही काम नव्हतं. कुठला तरी अजस्त्र हिमखंड तुटल्याच्या बातमी, अफवाही असेल कदाचित, नंतर व्हेनिस जवळपास रिकामं झालं होतं. मग तो बाहेर पडला. जरा जमिनीवर चालावं म्हणून. एका कॉफी शॉपमधे जाऊन बसला, एकदम पर्यटकाच्या थाटात. पण शॅम्पेन कसली परवडायला. स्वस्तातली बीयर मागवून बसला कॅनालमधल्या नसलेल्या रहदारीकडे बघत. सीगल्सचा गोंधळ त्याला आजच जाणवत होता.

त्याच्या टेबलवर एक छोटसं फूल ठेवलं होतं, लालसर. त्या फुलाकडे त्याने त्याच्या अर्ध्या रिकाम्या बीयरच्या ग्लासाआडून पाहिलं. बीयरचा लालेलाल फेस पाहून त्याला मजा वाटली. मग त्याने एक पेटंट त्रिकोणी घडीवाला टिश्यू पेपर उचलला. ते लाल फूल त्याच्या लांब देठासह त्या त्रिकोणावर छानपैकी पसरलं. त्या फुलातल्या पुंकेसरांकडे टक लावून बघता बघता त्याला त्याच्या लहानपणी व्हेनिसमधे जवळपास वर्षभर नांदणारं धुकं आठवलं. मग समोरचा ऊनल्याला कॅनाल त्याच्या डोळ्यात खुपलाच एकदम. बीयरचा शेवटचा ग्लास गपकन्‌ संपवला. का कोण जाणे, संपवलेल्या बीयरचा उरलासुरला फेस बोटावर घेऊन तो फुलावर शिंपडला. कॉफी शॉपवाल्याला पैसे दिले. फुलावर त्या फेसाजागी लाल रंग उतरून निळा चमकत होता. त्याला मज्जाच वाटली. ते फूल अलगद उचलून कानावर लावलं आणि तो बाहेर पडला; चालायला.

नेहमी लाल, हिरव्या, पिवळ्या फुलांच्या अपबीट पेस्टल शेड्स मधे वावरणार्‍या तिला मात्र आजचा रिकामा दिवस बोअर होत होता. ती कॅनालच्या सावलीतल्या पायर्‍या उतरली. सावलीतलं पाणी थोडं गार होतं. ते डोळ्यांवर चेहर्‍यावर शिंपडलं. सगळ्या रिकाम्या बांधून ठेवलेल्या बोटींमुळे कॅनाल बोटींवरून चालत पार करण्यासारखी परिस्थिती होती! त्यातल्या त्या एका कोपर्‍यातल्या बोटीकडे ती गेली. बोटीतल्या सीटचा निळा तिला आवडून गेला. सावलीत तो आणखीन डीप वाटत होता. त्या डुलणार्‍या बोटीतल्या त्या निळ्यावर ती थोडी अजून सरकून बसली. आणि शांत झोपून गेली.

Advertisements

5 thoughts on “व्हेनिसचा बोटवाला”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s