डोकेदुखी- ४

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३

 

“काय रे आणि तीन आठवडे झाले. ती कथा लिहीतोच आहेस अजून. ह्या कथेचही कादंबरीसारखंच करणार आहेस का?”
“कथेची कादंबरी? बाई गं डेली सोप लिहीणं सोडतोय मी आता तुला सांगितलं ना? किती टॉण्ट मारणारेस तेवढ्यावरनं.”
“तसं नाही रे बाबा. कादंबरी कशी पिक्चर मिळाला आणि पूर्ण केलीस. तसंच आता पुढचा पिक्चर मिळेपर्यंत कथापण अर्ध्यावरच का?”
“हो तसंच. पिक्चर लिहायला मिळाला. कादंबरी पूर्ण केली. त्या रॉयल्टीच्या पैशांवरच तर हनीमूनला गेलो ना आपण. आता कुणाला तरी हनीमूनला घेऊन जायला शोधतोय. ती मिळाली की कथा प्रकाशित. मग हनीमून.”
“नालायक आहेस”
“नालायक नाही. चल ना कुठेतरी जाऊ भटकायला… तुझ्या माहेरी नाही.”
“मग?”
“खूप दिवसात कुठे गेलोच नाहीये. कामाशिवाय घराबाहेर पडणंच होत नाही. परवा एकत्र बाहेर पडलो ते ही मोअरमधे जायला म्हणून… सेकंड हनीमून करूया चल”
“आधी लिहीतोयस ते पूर्ण कर.”
“यप”
“लव्ह यू”
“ए कसं असतं बघ ना… जगाबिगाच्या, अखिल मानवतेच्या गोष्टी करतो आपण. पण आपल्या भोवतालच्या वर्तुळातून बाहेर कधीच पडत नाही. माणसामाणसाप्रमाणे वर्तुळं लहानमोठी असू शकतात. पण तेवढंच. मग आता ही वर्तुळं. त्यातलं महत्वाचं असं त्या दोघांचं असं एक छोटंसं वर्तुळ. अरे हो, बरोबर आहे; मॅथेमॅटिकली स्पिकींग, त्या दोघांचं प्रायव्हेट वर्तुळ हे ते दोघं जगत असलेल्या त्या दोघांच्या वैयक्तिक वर्तुळांचा सबसेट आहे.”
“कर्रेक्ट! मोठेमोठे शब्द वापरून काय नवीन बोललास?”
“ए उपहास नकोय! खरी मजा पुढे आहे. की आता त्या दोघांची वर्तुळं जेवढी एकमेकांना छेदून जातात त्यामुळे त्यांच्यातल्या सामायिक होणार्‍या गोष्टींनीच त्यांच्या प्रायव्हेट वर्तुळावर परिणाम होणार. म्हणजे त्यांचं आयुष्य राहीलं एकीकडे. त्यांच्या आयुष्यातलं काय आणि कसं शेअर करायचं हा निर्णय त्यांचा त्यांनीच घ्यायचाय ना? इट एण्ड्स देअर.”
“हं. मग प्रेमासारख्या नाजूक नात्यावर जालिम जमाना टाईप गोष्टींचा कितपत प्रभाव पडू द्यायचा हे आपल्याच हातात असतं ना. दुःख शेअर करूच नयेत असं नाही. पण नातंच तुटायला लागलं तर झोल आहे ना यार…”
“देअर यू आर माय डिअर! बघूया आता हा काय करतोय ते…”
“आपल्या सेकंड हनीमूनच्या आत काय ते करू दे रे बाबा…”
“हो… … जेवायला काय आहे?”
“आंबेमोअर!”
“आणि? व्हॉट मोअर??”
“शी रे!…”
“तू आंबेमोअर म्हटलं तर जोक मी व्हॉट मोअर म्हटलं तर पीजे?”
“हो पीजे! झालं की बोलावते.”
“ओक्कीज!”


पन्नास पौंडी बारबेल तो एखाद्या बारबालेला उचलावं इतक्या आरामात उचलत होता. आता सगळ्याच बारबाला पन्नास पौंडी असतात का हा वेगळ्याच संशोधनाचा विषय ठरेल असं काहीबाही त्याच्या मनात आलं आणि तो स्वतःशीच हसला. हसू आलं तसा दम तुटला आणि त्याने बारबेल खाली आपटली. दोन क्षण आरशात नजर टाकली. पहाता पहाता त्याचे जेमतेम तेरा चौदा इंची बाहू त्याला मोठ्ठे घेरदार वाटू लागले. त्याने परत बारबेल उचलली आणि उजव्या दंडावरच्या फुललेल्या शीरेवर लक्ष केंद्रित करत त्याने व्यायाम सुरू ठेवला.
शालूच्या पदराच्या काठाच्या नक्षीवरून तिची आई तिच्यासाठी शालू परस्परच नापसंत करत होती आणि ती निर्विकारपणे त्या वाढत जाणार्‍या पसार्‍याकडे पहात होती. बाजूला वडिल पहिले पाच मिनीटं उत्साह दाखवल्यानंतर आता गुंगीच्या काठाकाठाशी डोलत होते. खर्‍या सोन्याच्या जरीच्या काठपदराचा शालू, तोही वजनाला हलका आणि मध्यमवर्गीय बजेटात आईला तिच्या लाडक्या मुलीसाठी हवा होता. मुलीचे लाड तिला हवी ती साडी घेऊन द्यायच्या ऐवजी तिला हव्या त्या मुलाशी लग्नाची परवानगी देऊन केले असते तर तिला जास्त आवडलं असतं. एक जड निश्वास सोडत तिने साड्या निवडण्यात नीट लक्ष घातलं.
जिमला जातायेता तो नेहमी सायकलच वापरायचा. आताही भरपूर व्यायाम करून जिमबाहेरच्या केळेवाल्याकडची दोन भलीमोठी केळी खाऊन तो घरी निघाला. जाताना वाटेत तिचं घर होतं. श्या उगाच आणली आज सायकल. तिला पळवून नाही नेता येणार. तिला आता डबलसीट घेणं हे अवघड असल्याचा सिन्सिअर आणि तिलाच काय कुणालाही पळवून नेलं तरी ’नेता’ येणारच नाही पुढच्या निवडणुकीपर्यंत असा तद्दन वाईट विचार त्याच्या मनात आला आणि त्याने सायकल तिच्या घरावरून त्याच्या घरच्या दिशेला दामटली.
तो पुढच्या वळणावर घरच्या दिशेने वळला तशी तिची टॅक्सी तिच्या घरच्या दिशेने वळली. फारशी खरेदी झालीच नव्हती पण थकल्या जीवांना ट्रॅफिकमधे अडकल्या अडकल्या झोप काढायला मिळावी म्हणून टॅक्सी. तो घरी गेला. घरात शिरल्या शिरल्या लवकरात लवकर तुला भेटायचं आहे असा तिला मेसेज केला. फोन सोफ्यावर टाकून तो आंघोळीला गेला. ती ही घामाने वैतागलेली. आल्या आल्या थेट बाथरूममधेच शिरली. मोबाईल पर्समधे वाजला पण तिचंच काय पण कोणाचंच लक्ष गेलं नाही. दोघंही एकाच वेळेस आंघोळत होते पण एकत्र नाही. तशी त्यांची एक फॅंटसी होती, एकत्र आंघोळ करायची.
फँटसीज्‌, स्वप्नंच जास्त चांगली असतात कधीही वास्तवापेक्षा. ती धोका देत नाहीत. कितीही जुनी झाली, कितीही अविश्वसनीय असली तरी तितकीच अचिव्हेबल आणि जवळची वाटत रहातात. तेवढाच आनंद देतात. वास्तवाचं तसं नसतं. गरजेपेक्षा जास्त कठोर वागतं. पण खरंच वास्तव कठोर वागतं की माणसं? त्याच्या डोक्यातली विचारांची साखळी आईच्या हाकेने तुटली. त्याने शॉवर बंद केला आणि जेलमधून सुटावं तसं बाथरूममधून लगेच बाहेर आला.
.
.
.

“हां हॅलो बोल.”
“आता का भेटायचं आहे?”
“अं? हॅलो एक मिनीट एक मिनीट होल्ड कर. हेडफोन्स लावतो.”
“इतकी काही प्रायव्हेट नाही बोलायचंय मला. अगदी हेडफोन्स वगैरे लावून बोलायला.”
“काही प्रायव्हेट उरलं तरी आहे का आपल्यात आता?
“प्लीज… नो टॉण्ट्स!”
“हं… आज जिममधे बायसेप्स वर्काऊट केलेत मी परत कानाला फोन लावून बोलत बसलो तर अवघडतील. म्हणून मग हेडफोन्स लावले.”
“नको राहू दे. इतका त्रास होणार असेल माझ्या कॉलचा तर… नंतर बोलू.”
“ए गपे. कधी आणि कुठे भेटायचं बोल.”
“परवापासून ऑफिसला सुट्टी टाकलीये. उद्याच भेटू. संध्याकाळी नेहमीप्रमाणे… कदाचित शेवटचं.”
“—”
“बाय.”

(क्रमशः)

Advertisements

4 thoughts on “डोकेदुखी- ४”

  1. “फँटसीज्‌, स्वप्नंच जास्त चांगली असतात कधीही वास्तवापेक्षा. ती धोका देत नाहीत. कितीही जुनी झाली, कितीही अविश्वसनीय असली तरी तितकीच अचिव्हेबल आणि जवळची वाटत रहातात. तेवढाच आनंद देतात. वास्तवाचं तसं नसतं. गरजेपेक्षा जास्त कठोर वागतं. पण खरंच वास्तव कठोर वागतं की माणसं? ”

    So true..!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s