डोकेदुखी- ६

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५ 

टिव्हीसीचं जवळपास ओरडल्यासारखं बोलणं, ऑफिसातल्या भानगडी, ढणढणाटी जाहिराती आणि आईचं सारखंसारखं जेवायला बोलावणं या सगळ्यातून, बेसिक जगण्यातून तो सुटला ते थेट झोपायला आडवा होतानाच. तोवर तिचे आठ मेसेजेस येऊन पडले होते. एकेक मेसेज म्हणजे रत्न होता. एक त्यांच्या नात्याचा, एक त्यांच्या प्रेमाचा, एक त्यांच्या स्पर्शांचा, दोन मेसेज फक्त त्यांनी एकत्र घालवलेल्या रात्रीवर आणि अस्पर्शित तिला घरी सोडताना आपोआपच दाटून आलेल्या अश्रूंवरच. आणि बाकी तिच्या आयुष्यावर, त्याच्या आयुष्यावर, त्या दोघांच्या कुटूंबांवर, तिच्या त्याच्यावर. त्यांचं नातं त्याला कळलं, पुन्हा नव्याने. आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमधील दगड धोंडे, फुलं पानं आणि मावळता सूर्यही. कितीतरी वेळ तो ते मेसेजेस परत परत वाचत होता. अनावर झोपेनी विचारांची लिंक तुटली की पुन्हा एकदा मेसेजेसचं पारायण करत होता. उशिरा कधीतरी झोपेला शरण गेला. तिच्या मेसेजेसला कसलंही उत्तर न देता.
मग पुन्हा नवा दिवस, पुन्हा ऑफिसला उशीर आणि पुन्हा टिव्हीसीचा कॉल. तो ऑफिसला पोचला तोवर त्याची टिम मीट टिव्हीसीनं त्याच्याशिवायच सुरू केली होती. त्याच्या टिमला नव्या प्रोजेक्टवर ट्रान्सफर केलं होतं. जगातली एक अतिशय बलाढ्य मायनिंग कंपनी त्यांची क्लायंट होती. प्रोजेक्ट इंडक्शन, डिटेलिंग, वीक टू वीक प्लानिंग ही सगळी खरंतर त्याची कामं. त्याच्या अनुपस्थितीत टिव्हीसीनेच बर्‍यापैकी ती उरकली होती. खरंतर आता प्रेझेंटेशन देणं हे ही त्याचंच काम होतं. ते टिव्हीसी करत होती. आणि तो ऐकत होता बाकी टिममेंबर्ससारखाच. क्वार्टरली अप्रेझलमधे वाट लागण्याची थंड जाणिव त्याच्या पाठीच्या मणक्यातून सरकत पार डोक्यात गेली. पुढच्या महिन्यात ह्या सगळ्याला अलविदा करायचं असूनही टिव्हीसी पूर्णपणे गुंगली होती प्रोजेक्टमधे. इतकी हुशार, एफिशियंट आणि करीयरिस्ट असलेल्या हिला तिचं होत असलेलं अरेंज्ड मॅरेज खरंच फन वाटतं?
तिची इकॉनॉमिक्स ची परिक्षा जेमतेम २ महिन्यांवर येऊन ठेपली होती. नेमका मुहूर्त तेव्हा किंवा त्याच्या आधीचा निघाला तर परिक्षा आणि सगळाच अभ्यास अक्कलखाती जमा होणार होता. त्याच्याशी बोलून झालं होतं तिचं. त्यानं तिच्या म्हणण्याला विरोध केला नव्हता पण त्याच्या आईवडिलांच्या लवकरात लवकराचा मुहूर्त पहाण्याच्या तगाद्याला आडकाठीही केली नव्हती. आज दुपारी ती परत अभ्यासाला बसली. पण आईनं तेवढ्यात कुठल्यातरी दूरच्या आजीचा आलेला फोन आणून दिला आणि अभ्यासाचं सगळंच फिस्कटलं. दूरच्या त्या आजीचे बोळके उच्चार आणि फारसं काम न देणारे कान; यातून आजीचं एकच वाक्य तिच्या लक्षात राहिलं, “तुझ्या वयाची असताना मला ४ मुलं होती हो…”. तिला त्याचं बोलणं आठवलं. जेव्हा तिने त्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी समजावून सांगितला होता आणि त्याने लॉच्या एक्सेप्शन्समधे Love असा अजून एक पॉईंट वाढवला होता. तो म्हणाला होता, “आम्ही जे काय करतो, लिहीतो ते सगळं शेवटी १ आणि ० एवढंच उरतं. महत्वाचं असतं की १ आणि ० किती आणि कुठे आहेत. ०१, १०, ००, ११ अर्थ वेगळे निघतात. महत्व अर्थांना असतं. युटिलिटीच्या एक्सेप्शन्समधे खरंच प्रेम असू शकतं का हे मला नाही खरंतर कळत पण आपल्यासाठी प्रेम हे प्रेम असावं. मी तुझ्या किंवा तू माझ्या उपयोगाची आहेस हा प्रेमाचा अर्थ नसावा आपल्या.” आणि तिने त्याच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले होते. आणि मग त्याने तिच्या पाणीदार डोळ्यांवर.
तिने एकशे अठ्ठाविसाव्यांदा मोबाईल चेक केला. त्याचा रिप्लाय नव्हता. तिने उद्वेगाने मोबाईल बाजूला फेकला.

Advertisements

3 thoughts on “डोकेदुखी- ६”

  1. “आम्ही जे काय करतो, लिहीतो ते सगळं शेवटी १ आणि ० एवढंच उरतं. महत्वाचं असतं की १ आणि ० किती आणि कुठे आहेत. ०१, १०, ००, ११ अर्थ वेगळे निघतात. महत्व अर्थांना असतं. युटिलिटीच्या एक्सेप्शन्समधे खरंच प्रेम असू शकतं का हे मला नाही खरंतर कळत पण आपल्यासाठी प्रेम हे प्रेम असावं. मी तुझ्या किंवा तू माझ्या उपयोगाची आहेस हा प्रेमाचा अर्थ नसावा आपल्या.”

    Simply awesome..!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s