डोकेदुखी- ७ (शेवट)

डोकेदुखी- १
डोकेदुखी- २
डोकेदुखी- ३
डोकेदुखी- ४
डोकेदुखी- ५
डोकेदुखी- ६

 

“एकशे अठ्ठावीस या आकड्याबद्दल तुझं काय मत आहे?”

“एकशे अठ्ठावीस? या आकड्यावर माझं काय मत असावं अशी तुझी अपेक्षा आहे?”
“तू सांग फक्त, मत.”
“बा लेखका, एकशे अठ्ठावीसात काहीतरी मत असावं असं काहीही खास नाही.”
“हूं. मला लिहायचं एक होतं आणि मी लिहून काहीतरी वेगळंच गेलोय. वाईट नाहीये इतकं खरं.”
“हं.”
“सांगायचा मुद्दा हा की आपल्या सेकंड हनीमूनला कदाचित उशीर होऊ शकतो.”
“हं…”
“…”
“इट्स ओके रे. टेक युअर ओन टाईम. पण छान लिही.”
“शुअर. थॅंक्स डिअर.”
.
.
.
“मी गॅसपाशी असताना नको रे अंगाशी येऊस.”
“बरं. मग मी गॅसपाशी येतो.”
“—”
“हो गं बाजूला. मी करतो आज जेवायला.”
“आनंदाने!”


ऑफिसात तो दिवस फार वादळी ठरला. संध्याकाळी जिमला जायला उशीर. जिममधे परत शोल्डर्स आणि थाईज्‍, सर्वात थकवणारं रूटिन. डोक्यात ती, लग्न, प्रेम, मेसेजेस, टिव्हीसी आणि पायावर ऐंशी पौंडाच्या प्लेट्स. आज तो जास्त नक्की कशाने थकला होता हे त्याचं त्यालाही सांगणं अवघड होतं. बाहेर येऊन बघतो तर केळेवाला गायब. मग समोरच्या दुकानातून एक कॅडबरी घेऊन चघळत बसला. मांड्या फारच आखडल्या होत्या. सायकल चालवण्यापेक्षा सायकल हातात घेऊन तो चालू लागला. काय झालं कोण जाणे, तिच्या घराबाहेर सायकल लावली. आणि तिच्या घराची बेल वाजवली. तिच्या वडिलांनी दार उघडलं. अपेक्षेप्रमाणेच घडलं. कसलंही स्वागत झालं नाही. तोच घरात येऊन सोफ्यावर बसलासुद्धा. तोच सोफा, तीच जागा जिथे बसून तिच्या आईवडिलांचा त्यानं नकार ऐकला होता.
“आहे?”
“आहेच पण तुला भेटणार नाही.” आवाज वरचा.
“बाबा कोण आलंय?”
“तू आत जा. तुझं काही काम नाही इथे…”
तरीही, “तू?”
“हो मी. चल लग्न करू.”
बावचळून, “अं?”
“रस्त्यावर आलेली नाही माझी मुलगी.”
“म्हणूनच लग्न करतोय. एका रात्रीसाठी नाही, आयुष्यभरासाठी मागतोय तुमच्या मुलीला.”
“एकदा नकार ऐकलास ना आमचा? परत आलास तरीही?”
“हं. कॅडबरी खाल्ली आत्ताच.”

त्या दोघांनी पब्लिक लायब्ररीत एकत्र अभ्यास करताना जागं रहायचा एकच उपाय शोधून काढला होता. कॅडबरी चघळत बसणे. शक्य तितके छोटे छोटे तुकडे तोडत अगदी चिकट घाण होईपर्यंत एक कॅडबरी चार चार तास ते दोघं पुरवायचे, आळीपाळीनं एकमेकांकडे कॅडबरी पास करत. एकदा, खरंच एकदाच; दोघांच्याही कॅडबरी बरबटल्या ओठांनी एकमेकांना पुसून घेतलं होतं. एक कॅडबरीवाला किस… तो ही लायब्ररीत! तिच्या आईवडिलांनी त्याला नाकारायचं कारण उघड होतं. त्याचं तिच्याशी आजवर घासूनपुसून गुळगुळीत झालेल्या निकषांप्रमाणे काहीच जुळत नसणं. आणि आता ह्या क्षणी ती तेच विसरली होती. त्यांच्यातल्या इन्कम्पॅटिबिलिटीज्‍, डिफरंस ऑफ ओपिनियन्स, त्याचं डोकं सरकलं की विचित्र वागणं हे काहीही न आठवता तिच्या मनात कायम राहिलं ते फक्त प्रेम. प्रोबॅबली इन द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ इट. सुरूवात कालच्या तिच्या लंब्याचवड्या एसेमेसेसपासून आणि रूढार्थी शेवट इथे. त्याचं परत एकदा तिच्या घरी येणं तिला फार सुखावून गेलं. आता परत घरात वादळ येणार हे दिसत होतंच. पण तिला पर्वा नव्हती. त्याचा खरेपणा तिला जाणवत होता. दुर्दैवाने, फक्त तिलाच. तो जिमहून थेट इथेच आलाय ते कळतच होतं. त्याचा चिंब भिजलेला जर्सी त्याचे बसल्याबसल्या थरथरणारे थाईज्‍… आणि त्याचा शांत तरीही खंबीर आवाज. एकदा अशाच शांत आवाजात तो म्हणाला होता, तिला आठवलं, “कम्पॅटिबिलिटीचे प्रॉब्लेम्स आपण कम्प्युटर्सपुरतेच मर्यादित ठेवूया. दोन अधिक दोन चारच करण्याचा हट्टाग्रह फक्त कम्प्युटरचा. आपलं उत्तर काहीही येवो. ते सारखं आलं पाहिजे, दोघांचंही.” तिनं मग मोठ्ठा होकार भरला आणि त्याचा गालगुच्चा घेतला होता.

“मी काय म्हणतोय. लक्ष कुठं आहे?”
“अं? काय बाबा?”
“तुझं प्रेम आहे का ह्याच्यावर? काय म्हणतोय हा?”
“हो. म्हणजे कम्पॅटिबिलिटीचे प्रॉब्लेम्स आपण कम्प्युटर्सपुरतेच मर्यादित ठेवूया.”

तो हसला. आणि बाबा गोंधळले.

तिने त्याच्या हस्तलिखिताचं शेवटचं पान उलटलं. तो म्हणाला, “आयच्यान्‌ पुढे काही सुचत नाहीये. हे इतकंच आहे. असंच.” आणि तिनंही मग अवली उत्तर दिलं, “काय तू तुझ्या प्रायोगिकगिरीतून बाहेर पडला नाहीच्चेस. ऍब्रप्टच एंडिंग नेहमीप्रमाणे.”
“अगं प्रायोगिकगिरी कसली? मला वाटलं पटलं तेच लिहीलं ना? लेबलं कसली लावतेस?”
“शेवट ऍब्रप्ट नाहीये का सांग.”
“शेवटाचा झोलच आहे गं सगळा. एक मन सांगतंय याच्यापुढे काहीच सांगण्यासारखं नाहीये माझ्याकडे. एकतर मला त्याची नसती हिरोगिरी दाखवून फिल्मी वाटू शकणारा ते एकत्र आल्याचा शेवट नको होता. बेसिकली एकत्र येणं हा शेवट नसू शकतो, नाही का?”
“डायलॉग नको रे मारूस.”
“डायलॉग? आणि उगाच त्यांना दूर करून त्या बच्च्याला तडपवायचं नव्हतं मला…”
“तुला ना लेखका, कसला निर्णयच घ्यायचा नाहीये मुळात?”
“अरे… ?”

तो आणि ती मनसोक्त भांडू लागले.

मी इतकं लिहून थांबलो. काही जवळच्या लोकांना वाचायला दिलं. त्यांची मतं आजमावली. अर्थात्‌, हा शेवट नाही. पण सध्यापुरती तरी ही गोष्टीची गोष्ट इथेच संपतेय. चांगल्या वाईटाचा निर्णय अर्थात आपल्यावर आहेच. तेव्हा पूर्ण कथेवर आपले दिलखुलास अभिप्राय गरजेचे आहेत.

धन्यवाद.

 

(समाप्त)

5 thoughts on “डोकेदुखी- ७ (शेवट)”

  1. आल्हादराव ,शेवटी आज डोकेदुखी पूर्ण वाचायचा मुहूर्त निघाला . कथेचा ट्रॅक कॉमन असला तरी ती चांगलीच जमली आहे.सादरीकरण आणि भाषा उत्तम ….मस्तच ..पुलेशु … 🙂

    1. तुकड्या तुकड्यातली कथा शांतपणे पूर्ण वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक आभार…
      आकारमानानुसार आजवरची माझी सर्वात मोठी ब्लॉगपोस्ट/सिरीज! 🙂

      खूप हुरूप दिलास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s