राजा आणि प्रधानाचा वग

राजा: कोण आहे रे तिकडे?

प्रधान: मी आहे सरकार…

(प्रधान काही बाहेर येत नाहीत.)

राजा: कोण आहे रे तिकडे?

प्रधान: मी आहे सरकार…

राजा: अहो मग इकडे या…

प्रधान: आलो आलो सरकार… राणीसाहेबांना आंघोळ घालत होतो म्हणून थोडा वेळ लागला

(घाईघाईत हात पुसत, कपड्यांवरचं पाणी पुसत येतात)

राजा: काय? राणीसाहेबांच्या सगळ्या दासी कुठे गेल्या?

प्रधान: आपणच कॉस्ट कटींगच्या नावाखाली सगळ्यांना काढून टाकलंत ना…

राजा: म्हणून तुम्ही राणीसाहेबांना आंघोळ घालायची?

प्रधान: राणीसाहेबांचीच आज्ञा तशी.. पाठ चोळून दे म्हणाल्या… दिली…

राजा: (राजाचा राग आता शांत झाल्यासारखा) अच्छा फक्त पाठच चोळून दिलीत तर…

प्रधान: हो महाराज. बाकी सगळं काय… पाठ आहे…

राजा: (ओरडून) काय?

प्रधान: नाही म्हणजे… बाकी सगळं काय राणीसाहेब त्यांचं त्यांचं करतात… हो…

राजा: फारच पाठी पडलात म्हणायचं राणीसाहेबांच्या?

प्रधान: आता काय करणार. मी पडलो साधासुधा नोकर. पाठ स्वच्छ नसेल तर राणीसाहेब बॅकलेस चोळी तरी कशी घालणार, नाही का?

राजा: बॅकलेस चोळी… (राजा राणीसाहेबांच्या उघड्या पाठीच्या स्वप्नरंजनात हरवतो.)

प्रधान: चोळी नाहीच घातली तर तुमची ही अशी अवस्था अजून लांबेल…

राजा: प्रधानजी…

प्रधान: पण असतात काही सामाजिक संकेत… चोळी घालावीच लागते.

राजा: सामाजिक संकेतात अजून एक संकेत टाका… बॅकलेस चोळीवर बंदी… चोळ्या घालायच्या आणि बॅकप्लस चोळ्याच घालायच्या…

प्रधान: आयला म्हणजे नुस्तं पाठीचं काम राहिलं होतं ते ही सुटणार का?

राजा: प्रधानजी…

प्रधान: होय महाराज

राजा: होय काय होय? दवंडी कोण पिटणार? चोळी?

प्रधान: अनर्थ होईल महाराज अनर्थ होईल…

राजा: अनर्थ काय ह्यात?

प्रधान: मानवतावादी संघटना मोर्चे काढतील, धार्मिक संघटना तुम्हाला वाळीत टाकतील!

राजा: काय? बॅकलेस चोळीबद्दल काहीतरी माईंडलेस बोलू नका उगाच…

प्रधान: महाराज ऐका तरी…

राजा: नाहीतर मी तुम्हाला पदलेस करीन…

प्रधान: काय? पदलेस?

राजा: होय. पदच्युत म्हटलं तर सेन्सॉर कच्चं खाणार नाही मला??

प्रधान: हं… पण महाराज खरं सांगतो. ऐका एकडाव. असा निर्णय घेतलात तर जनमत आपल्या विरोधात जाईल…

राजा: म्हणजे काय आम्ही नुसतं हात चोळीत बसायचं?

प्रधान: हात चोळीत… (स्वप्नरंजनात हरवतो.)

राजा: प्रधानजी…

प्रधानजी: होय महाराज.

राजा: होय काय होय? मानवतावादी संघटना मोर्चे का काढतील?

प्रधान: ते काय आहे महाराज, मुन्नी बदनाम झाल्यापासून चोळी असावी तर बॅकलेसच असा एक फॅशन ट्रेण्ड आपल्याकडे सुरु झालेला आहे.

राजा: काय सांगता?! मला वाटायचं ब्लाऊजचं म्हणून जेवढं काय कापड विकतात तेवढं कापड राणीसाहेबांना झाकायला पुरत नाही म्हणून चोळी बॅकलेस राहते!

प्रधान: हो ना. आणि मागच्या एका गाठीवर केवढीतरी जबाबदारी पडते.

राजा: हो ना…! – (सावरून) प्रधानजी

प्रधानजी: होय महाराज.

राजा: होय काय होय? पण म्हणून मोर्चे काय काढतील?

प्रधानजी: आजकाल काय चालू आहे?

राजा: नुसता उच्छृंखलपणा चालू आहे.

प्रधानजी: नाही महाराज ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे.

राजा: बरं मग?

प्रधानजी: उघड्या अंगावर वारं लागलं की कसं वाटतं?

राजा: गार गार वाटतं (हुडहुडी भरते.)

प्रधानजी: फिर इस ग्लोबल वार्मिंगके दौरमे जैसे चाहो वैसे वारा पाने का और गार गार वाटने का सबको हक बनता है की नही?

राजा: बनता है!

प्रधानजी: असं गार वाटणं हे माणसाच्या मुलभूत हक्कांमधे समाविष्ट आहे महाराज आता. अन्न, वस्त्र, निवारा आणि गार हवा…

राजा: काय सांगता? कधी पासून??

प्रधानजी: जेव्हापासून अन्न वस्त्र निवार्‍याइतकीच गार हवाही मिळायला अवघड झाली तेव्हापासून…

राजा: असं होय? मग आता?

प्रधानजी: आता तुम्ही बॅकप्लस चोळी घालायची जबरदस्ती करून महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून दूर लोटताय…

राजा: (विचारात पडतात) हं… आमचा महाल तर फुल्ली एअर कंडिशन्ड आहे मग राणीसाहेबांना बॅकलेस चोळी घालायची आणि त्यासाठी तुमच्याकडून पाठ चोळून घ्यायची काय गरज?

प्रधानजी: महाराज, राज्यात लोडशेडींग किती चालू आहे ह्याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? महालातसुद्धा तुम्ही जिथे असाल तिथलाच एसी चालू असतो…..

राजा: च्या आयला तरीच राणीसाहेब आम्हाला दिवसातून दहा पाच वेळा मिस यू असा एसेमेस पाठवतात…

प्रधानजी: काय महाराज?

राजा: काही नाही. काही नाही.

प्रधानजी: बरं महाराज.

राजा: बरं काय बरं? धार्मिक संघटनांचं काय मत आहे?

प्रधानजी: महाराज तुम्हाला म्हणजे सगळं उघडूनच दाखवावं लागतं… महाराज आजकाल काय चालू आहे?

राजा: ग्लोबल वॉर्मिंग

प्रधानजी: वाटलंच मला तुम्ही गोंधळ घालणार… महाराज आजकाल नवरात्र चालू आहे!

राजा: अरे हो की… दांडिया खेळायला जायचं आहे राणीसाहेबांबरोबर… (हळू आवाजात) आमच्यासोबत दांडिया खेळायची मजा काही वेगळीच आहे… असं म्हणाल्या त्या… बरं का!

प्रधानजी: कोणासोबत येणार्‍या मजेपेक्षा तुमच्यासोबत येणारी मजा वेगळी आहे महाराज? (राजा गोंधळतो.) जाऊ द्या महाराज. नवरात्रीत चालायचंच…

राजा: हूं

प्रधान: तर बॅकप्लस चोळी घालायची जबरदस्ती करून तुम्ही महिलांना योग्य प्रकारे देवीची पूजा करण्यात अडथळा ठरणार महाराज…

राजा: तो कसा काय?

प्रधान: बॅकलेस चोळी घालून जेमतेम पोटर्‍यांपर्यंत येणारा घेरदार घागरा घालून रात्रभर दांडिया खेळण्याने होते ती देवीची पूजा… महाराज आता बॅकप्लस चोळीचा नियम करून तुम्ही त्यांच्या पूजेत किती मोठा अडथळा आणताय बघा… विदाऊट बॅकलेस, नवरात्र इज वर्थलेस … (जीभ चावतो.)

राजा: काय म्हणालात?

प्रधान: (चाचरत) विदाऊट बॅकलेस, नवरात्र इज वर्थलेस… … हे माझं वाक्य नाही महाराज. राणीसाहेबांचं आहे.

राजा: (अविश्वासाने) क्काय?

प्रधान: मघाशी आंघोळ घालत होतो तेव्हा म्हणाल्या…

राजा: पाठच चोळत होतात ना?

प्रधान: होय महाराज.

राजा: होय काय होय? पाठ चोळून देताना बोलल्या असं म्हणा.

प्रधान: होय महाराज

राजा: होय काय होय? आता काय करायचं मग?

प्रधान: काही नाही महाराज. बॅकलेस चोळीला कापड कमी लागतं त्यामुळे तेवढंच कापड कमी कमी आकारात का होईना पण जास्तीत जास्त प्रजाजनांपर्यंत पोचतं यात आनंद मानायचा…

राजा: हं….. (हताश होऊन विषय बदलत) युवराज काय करतायत?

प्रधान: फोटो टूरवर गेलेत महाराज.

राजा: कसले फोटो काढायला?

प्रधान: गड किल्ल्यांचे फोटो महाराज…

राजा: ताबडतोब बोलवून घ्या युवराजांना… तुटक्या फुटक्या गड किल्ल्यांचे कसले फोटो काढता म्हणावं… बॅकलेस चोळ्यांचे काढा.

प्रधान: बरं महाराज.

राजा: आणि सांगा राज्यात बॅकलेस चोळ्यांचे किती प्रकार अस्तित्वात आहेत आणि त्यातून राज्यात किती कापड वाचलं ह्याचा सविस्तर अहवाल सादर करायची आज्ञा आहे माझी…

प्रधान: नक्की महाराज.

राजा: आम्ही जातो आता. आमची दांडिया खेळायची वेळ झाली. (सिंहासनावरून उठतात. प्रधानांच्या बाजूला येऊन) तुम्ही खेळता की नाही दांडिया?

प्रधान: (चेहरा पाडून) आम्ही कसले दांडिया खेळतो महाराज… गरीब माणसं… नुसता गरबाच खेळतो….

(महाराज खो खो हसत सुटतात.)

आल्हाद
२ ऑक्टोबर ११

7 thoughts on “राजा आणि प्रधानाचा वग”

Leave a reply to Nil Arte उत्तर रद्द करा.