खिडकीत

रोज होते तशीच सकाळ आजही झाली. रोज जातात तसेच आजही ते वेळेवर ऑफिसला निघून गेले. रोज वाजतात तसेच आजही साडेदहा वाजले. आणि ती तीचे लांबसडक केस विंचरत खिडकीत येऊन उभी राहिली. महामुंबईतल्या कुठल्या तरी बारक्या उपनगरातली म्हाडाची वसाहत. त्यांच्या सर्वात शेवटच्या मजल्यावरील घरातून दूरवरची रेल्वे लाईन दिसे. रोज सकाळी अनिमिष नेत्रांनी लोकल्स आणि स्टेशनवरची अफाट गर्दी ती बघत बसे. तिच्या गावची, स्मशानात आजवर जाळलेल्यांसह जरी लोकसंख्या मोजली तरी स्टेशनवरच्या गर्दीइतकी भरली नसती. मुंबईत तिला सांभाळून घेणारे आणि रोज रात्री खूप दमून घरी येणारे पुन्हा एका रिकाम्या दिवसासाठी तिला घरी ठेवून निघून गेले, त्याच गर्दीत.

रात्रीच्या आठवणीनं ती अंतर्बाह्य शहारली. नेहमीप्रमाणे तिपेडी वेणी न घालता नुस्ताच सैलसर अंबाडा बांधला आणि खुर्चीत विसावली. पण क्षणभरच. कसल्यातरी धुंदीतच उठली, आवरलं, जेवली. आणि नेहमीप्रमाणे टिव्ही न लावता आतल्या खोलीत शिरली. तिला शहारवणार्‍या रात्रीचा मागमूसही तिथे आता नव्हता. त्यांचा ओला टॉवेल, वाळलेले कपडे, तिला घेऊन दिलेला मोबाईल, चहाचा डाग पडलेला चुरगळलेला पण ताजा पेपर, या सगळ्याला खिडकीतून येणारं ऊन जाळून काढत होतं. जेमतेम तिला बसण्यापुरती जागा होती तिथे ती बसली. परत उठली. खिडकी लावली. पडदे नव्हतेच. पंखा फुल केला. तिला तिची रात्र परत हवी होती. टॉवेल वाळत टाकला. कपड्यांच्या घड्या केल्या. ते जागेवर ठेवले. पलंगावरच्या सुरकुत्या न्‌ सुरकुत्या झटकून टाकल्या. काहीतरी लक्षात आल्यासारखी त्यांच्या उशीकडे गेली. तिच्या हिरव्या चुड्यातली एक बांगडी काल वाढली गेलेली. तो तुकडा तिला मिळाला. आणि धसमुसळेपणाबद्दल मनापासून सॉरी म्हणताना त्यांनी तिच्या मनगटावर हलकेच टेकवलेले ओठ ही आठवले… त्यांची उशी कुशीत घेऊनच ती झोपी गेली. येणार्‍या रात्रीची स्वप्ने बघत, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद देण्याची…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s