शाळा- एक अनुभव

सर्वात आधी सांगतो की मी मिलिंद बोकील यांची शाळा कादंबरी वाचलेली नाही. आणि दुर्दैवाने शाळा सिनेमा बघून, आता तर ही कादंबरी कसंही करून वाचलीच पाहिजे असं कुतूहलही जागं झालं नाही. तेव्हा फायदा असा की मी शाळा सिनेमा बघायला कोर्‍या करकरीत पाटीने गेलो. जोशी, शिरोडकर, म्हात्रे, पवार, केवडा (आयशपथ खरं नाव आडनाव आठवत नाहीये कॅरेक्टरचं!) यांची कादंबरी वाचून मनात तयार झालेली प्रतिबिंबं घेऊन मी गेलो नव्हतो. त्यामुळे शाळा सिनेमा मला फक्त सिनेमा म्हणून बघता आला.

याक्षणाला सिनेमा पाहून साधारणतः पाच तास झालेत. लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे सिनेमॅटोग्राफरचं काम, शिरोडकरचं गोड दिसणं आणि सोज्वळ वागणं, जोशी, पवार आणि म्हात्रेचे परफॉर्मन्सेस, आणि आणीबाणीचा संदर्भ अजून ठळकपणे यायला हवा होता असं राहून राहून वाटणं. तर दिएगो रामिरो ह्या स्पॅनिश सिनेमॅटोग्राफरच्या नजरेतून दिसणारा कोकण अप्रतिमच दिसतो यात वाद नाही. परफेक्ट टाईट फ्रेम्स, सदैव केलेला शॅलो डॉफचा वापर आणि सॅच्युरेटेड वाटणारे कलर्स ही काही ठळक वैशिष्ट्यं. पण होतं असं की काही काळानंतर तो टोन खूप मोनोटोनस होऊन जातो. पुन्हा कोकणात काही फारशी थंडी वगैरे नसतेच. त्यामुळे सारखं धुकाळलेलं वाटणारं ऍटमॉस्फिअर थोडं खुपतं. सिनेमा साधारणतः वर्षभराचा काळ दाखवतो. म्हणजे पावसाळ्यापासून ते दिवाळीतली माफक थंडी आणि मग रिझल्ट म्हणजे उन्हाळा वगैरे. ह्या सगळ्या सिनेमॅटोग्राफीतून ऋतूंचं बदलणं जाणवतच नाही. एक नरूमामा आणि जोशीचा सीन सोडला तर ऊन पडलंय असं कधी दिसलंच नाही! त्या ही सीनमधे ऊन पडलंय हे कळतं पण ते दुपारी अकरा वगैरेचं थोडाफार घाम आणणारं ऊन आहे असं काही जाणवत नाही. अर्थात, शाळा सिनेमाच मुळात फक्त लव्हस्टोरी म्हणून पब्लिसाईझ केला गेला असल्यानं गोड लाजर्‍या पपी लव्हला टोन शोभतो! बाकी उत्तम.

शिरोडकर दिसावी तितकी गोड दिसलीये आणि सोज्वळ वागलीये. ती इतकी गोड दिसते (अगदी वर्गातल्या इतर मुलींच्या तुलनेतही!) की जोश्याला आवडेपर्यंत दुसर्‍या कुणालाच कशी दिसली नाही असाही एक खट्याळ विचार मनात येऊन गेला; पण असो. तर शिरोडकरला गोड नाजूक आणि सोज्वळ पलिकडे काम नाही. आणि जे केलंय ते मस्तच. आता मोठी होताना आईसारखी गायिका होणार की अभिनेत्री हा एक मोठा विचार तिला करावा लागणार आहे असं दिसतंय. जाऊ दे. पण शिरोडकरने आपल्या वावरातून प्रत्येकानेच आपापल्या मनात दडवून ठेवलेली शिरोडकर जागवली आणि असा शब्दशः काळजाला हात घातल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

जोशी आणि त्याचे तिघंही मित्र त्यांच्या खर्‍या आयुष्यातल्या शाळा, तिथले तुलनेने मॉडर्न रेफरन्सेस बाजूला ठेवून विसरून ती गावातली शाळा त्याच काळात जगतात. जोशीचं खूश होऊन सरस म्हणणं, म्हात्रेचं इचिबाना हे परत काही काळासाठी फॅशनीत येईल. ह्याचं सर्व श्रेय त्यांनी कामात दाखवून दिलेल्या प्रामाणिकपणाला. पोरं इतका सहज अभिनय करतात की तो शिकवलेला किंवा करवून घेतलेला अभिनय वाटतंच नाही. दिग्दर्शकांचं अभिनंदन. बाकी ऍक्टर्स परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर फार कमी कॅरेक्टर्स व्यवस्थित डेव्हलप होतात. अनेक कॅरेक्टर्स पूर्ण न आल्यासारखी वाटतात. उदाहरणार्थ, अमृता खानविलकरचं उग्गाच नटवं दिसण्यापलिकडे काय काम आहे? जोशीचे वडिल, त्यांचे विचार, त्यांची रहाणी काहीच एक्स्प्लेन होत नाही. तर असो.

शाळा सुरू होतो तो लव्ह स्टोरीच्या नोटवर आणि संपतो ही तिथेच. शाळा कादंबरी वाचलेल्यांच्या बोलण्यावरून आणि शाळा सिनेमाच्या वेबसाईटवर दिलेल्या डिस्क्रीप्शनवरून असं लक्षात येतं की कादंबरी ही नुसती प्रेमकथा नसून तिला आणीबाणीच्या पर्वाचा अतिशय समर्थ बॅकड्रॉप लाभलेला आहे. दिग्दर्शक सुजय डहाके असं म्हणतात की When I first read Shaala, I was mesmerized by the sheer loneliness of the character of Joshi. The backdrop of the Emergency and the influence of the hippie culture gives the book a very interesting backdrop with, in my opinion, some of the most interesting characters in Marathi literature. अरेच्च्या! सिनेमात तर फक्त लव्ह स्टोरीच कशी उतरली मग? जोशी नेहमीच मित्रांसोबत दिसतो. एकटा फारसा नाहीच. एकदा तळ्यात दगड फेकताना आणि अगदी शेवटी. हिप्पी इन्फ्लुएन्स नरूमामाच्या कॅरेक्टरमधून पुरेपूर उतरतो. पण मग आणीबाणीसारख्या भारतीय इतिहासातल्या महत्वाच्या पर्वाचं काय? खरंतर मी शाळा कादंबरी वाचलेली नाही आणि शाळा सिनेमा मला नुस्ती एक लव्हस्टोरी म्हणूनही आवडलाय. पण आणीबाणीसारख्या महत्वाच्या मुद्द्याला मोजून चार सीन्समधे बाजूला करण्यात आलंय हे नक्कीच खटकतं. म्हणजे कसं की, एका टप्प्यानंतर जोशीला आपलं पुढे काय? असा प्रश्न शिरोडकरच्या संदर्भात पडणं आणि तो त्यानं तिला सरळसरळ विचारणं यामागे फक्त तिच्या वडलांच्या होणार्‍या बदल्यांचं कारण नाहीये. मुख्य कारण आहे ते आणीबाणी आणि अनुषंगाने त्या नववी ब मधल्या मुलाच्या मनात सुरू झालेले विचार. इतिहासाच्या सरांशी होणार्‍या विचारविनिमयातून या विषयाची सुरूवात तर उत्तम होते. पण नंतर मात्र आणीबाणीचा विषय हरवल्यासारखा होतो. नुसताच असंही काहीतरी चालू आहे बरंका इतकं म्हणण्यापुरता वरवरचं अस्तित्व दाखवत रहातो. जवळपास दोन तासांचा सिनेमा अजून दहा-पंधरा मिनीटं वाढला असता तर हरकत नव्हती. पण आणीबाणीचं मात्र चित्रण अजून व्हायला हवं होतं असंच राहून राहून वाटतंय.

एनीवे, शाळा सिनेमा कादंबरी वाचलेल्यांसाठी आणि न वाचलेल्यांसाठीही रेकमंडेड आहे. निदान एकदा तरी नक्कीच पहावा…

शाळा सिनेमाच्या सर्व कास्ट आणि क्रूचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.

 

आल्हाद महाबळ

12 thoughts on “शाळा- एक अनुभव”

 1. अरे नुसतं आणीबाणीच नाही तर पुस्तकात तत्कालीन सामाजिक परिस्थिती, जातीभेद, तथाकथित उच्चनीचता इ इ इ जोरदार हल्ले केलेले आहेत. निदान तुझ्या पोस्टवरून तरी मला चित्रपटात यापैकी काहीही आलंय असं वाटत नाहीये. असो.. तरीही बघायचा आहेच हे नक्की !!

 2. आल्हादा, माझी पण निराशा झाली पण ती यामुळे कि पुस्तक बऱ्याचदा वाचले आहे.
  पुस्तकात बरेच काही आहे जे सर्व काही चित्रपटात येऊ नाही शकत. या मर्यादा दिग्दर्शकाला ही जाणवल्या असतीलच.
  आणि त्यामुळे प्रयोग थोडा फसतो कारण प्रेक्षकांची स्थिती मुंबई दर्शनाला आलेल्या पर्यटकासारखी होते. म्हणजे सगळेच काही थोडक्यात आणि मोजक्या वेळेत पहायचे आणि समजून घ्यायचे अवघड आहे.
  चित्रपट म्हणून शाळा चांगला आहे. पण हा पुस्तकावर बेतलेला नसता तर अधिक चांगला झाला असता असे वाटते. कथानकात बदल करणे अशा वेळी शक्य होत नाही आणि जे आहे ते २ तासात मांडणेही.
  पुस्तक नक्की वाचच. चित्रपटाहून कैक चांगल्या दर्जाचे आहे.
  आणि…”पुन्हा कोकणात काही फारशी थंडी वगैरे नसतेच”
  हे कुठून आले ? शाळा तर डोंबिवली मधील आहे कथानकात. कदाचित पुस्तक वाचले नसल्याने लक्षात आले नसेल.

 3. सागर, खरंय तुझं. सिनेमा अजून थोडा मोठा असता तरी चालू शकला असता ते ह्याचसाठी! 🙂

  सिनेमात कोकणातील एक साधारण तालुकाप्लेसचं गाव वाटावं ह्याच प्रकारे दाखवलं गेलं आहे. बाकी थंडीचंच म्हणायचं तर डोंबिवलीत तरी कुठे आलीये फारशी थंडी! 🙂

  महेन्द्रकाका, हेरंब, हर्षद… धन्यवाद!

 4. Alhad and Sagar ..me punha ekada review kela..mala tumachee mat ata adhik susangat vatatahet….me majhya review madhye kahee sudharana kelyat..( te bold letter madhye lihilay)..pustakatal barach rahilay..pan ek director’s cut mhanoon, te na samavisht karatahee ek utkrusht cinema banavata yeto., jar kathanak poorn samajoon tyachyashee pramanik rahayach tharaval tar..kahee thikani director chukalay…tareesuddha ha ek changala movie ahech..

 5. कथा डोंबिवलीतील कान्हे नामक गावात घडलेली, यात कोकणाचा काडीमात्र संबंध नाही. आणि १९७५ साल मध्ये असणाऱ्या डोम्बिवलीचे इमँजीनरी आम्हाला तरी व्यवस्थित वाटली राव… आता नावं ठेवायचीच झाली तर बऱ्याचश्या गोष्टी आहेत, पण मारून मुटकून मुसलमान करणे कशासाठी?? चित्रपट टेक्निकली चांगला झाला आहे, अभिनय सुंदर आहे, पुस्तकाच्या मानाने चित्रपट डीस्क्रीप्टीव्ह नसला, अभिनयातून सांगणारा आहे आणि विशेष म्हणजे सध्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत सरस आहे.. चित्रपट शाळेत गेलेल्या सर्वांसाठी या पेक्षा चांगला सध्या तरी असू शकत नाही… 😀

  1. ‘मारून मुटकून मुसलमान’ मी मुळीच करू इच्छित नाही. सिनेमा उत्तमच आहे असं माझं मत मी पुरेशा प्रमाणात मांडलंय. अर्थात त्यावर माझी मतं मी मांडली आणि साधकबाधक चर्चा घडली इतकंच! 🙂 ७५ साली ह्या भूतलावर नव्हतो. तरी माझ्या अंदाजांप्रमाणे तरी (आजघडीची डोंबिवली परिसराची अवस्था माहित असल्याकारणाने!) डोंबिवली मी सिनेमात दाखवल्याप्रमाणे नसावी. असो.
   बाकी सध्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत सरस तर आहेच. 🙂

 6. पुस्तकात जे आहे ते बरेचसे चित्रपटात नाही हे मलाही जाणवले….खरं तर पुस्तक वाचून देखील दीड-दोन वर्ष उलटली पण शाळा येणार, शाळा येणार अशी हाकाटी चालली होती ती आल्यावर मात्र फारशी गर्दी खेचू शकली नाही हे वास्त्व आहे.

 7. चित्रपटात दाखवलेले ठिकाण कोकणातील गाव नसून पन्हाळा आहे. त्यामुळेच तिथे धुके वगैरे दिसतय. बाकी चित्रपट अभिजात वगैरे नसला तरी आवडला. निश्चित मनोरंजक आहे. 🙂

 8. आल्हाद , चित्रपटाची समीक्षा छान लिहिलीस…..
  खरच, चित्रपटाची लांबी आणखीन वाढवली असती आणि आणी बाणी विषयी आणखीन दाखवला असतं तर चांगला झाला असतं !!
  काही ठिकाणी गोष्ट तुटल्यासारखी वाटते…..आणि शेवटी ती केवळ प्रेम कहाणी उरते!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s