शितू आणि चानी

काल रात्री उशिरापर्यंत वाचत होतो. गोनीदांची शितू वाचून पूर्ण केली. वाचून पूर्ण केली, पुस्तक खाली ठेवलं. दोन क्षण अगदी शांत बसलो. आजूबाजूलाही सगळीच शांतता पसरली होती. शितूच्या आयुष्यातील एकेक क्षण जसा डोक्यात फिरत होता तशीच आठवली ती चानी. चानी, चिंत्र्यंची चानी. चानी? ती का बरं आठवावी? दोघी कोकणच्या लाल मातीतल्या निसर्गकन्या म्हणून? की दोघीही आईवेगळ्या म्हणून? कदाचित नाही. कोकणच्या लाल मातीत, नारळझापांनी शाकारल्या घरांत, भाताच्या पेजेत आणि संध्याकाळासोबत भरून येणार्‍या दाट अंधारासोबत कारूण्याच्या झालरीनं ह्या दोघींनाही जन्मतःच मुंडावळ्या बांधल्या होत्या. दोघींनाही त्यांची काळजी करणारे समवयस्क आणि वडीलधारेही मिळालेच पण त्या मायेलाही जागोजाग पुरून उरला तो त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, आणि अवहेलना. शितू आणि चानी, दोघींनीही ती विनातक्रार सहन केली. दोघींचं हेच साहजिकरित्या घडणारं, वाट्याला येणारे भोग भोगणं आपल्या डोळ्यांना मात्र अश्रूंच्या झालरी देऊन जातं.

शितू आणि चानीमधे असलेल्या फरकांपेक्षा मला त्यांच्यातली साम्यस्थळं चकित करतात. मनात कसलेही छुपे हेतू, किल्मिषं न बाळगता निव्वळ चांगुलपणाने जगत रहाणं. तथाकथितरित्या समाजातील खालच्या जातीत जन्माला येण्यानं, लाल धुळीनं धोतर माखावं तसं नेहमी अपमान आणि अवहेलनांनी ह्यांचा दिवस संपे. ह्या दोघींचीही आयुष्यं जाणत्या वयाच्या सुरूवातीलाच संपून जातात. तरीही त्यात वारंवार आठवत रहातं दोघींचं सरळ साधं वागणं. चानीचा, विशेषत्वाने, स्वार्थापोटी सतत वापर होत रहातो आणि अजाणत्या वयापासूनच ती तो स्वेच्छेने होऊ देत रहाते. शितूचं मात्र सुदैवाने असं नाही. समाजाच्या दृष्टीने लहानग्या वयात ‘घोखाई’ ठरल्यानंतर तरी तिला खोतांच्या रूपाने आसरा मिळतो. साम्यस्थळांबद्दल लिहीताना हे फरक मुद्दामच विशद करावेसे वाटले कारण ह्या फरकांच्या पार्श्वभूमीवरून पुढचं साम्य जोरदार व्यक्त होतं. एक प्रकारची सखोल, समजूतदार आणि शहाणी प्रेमभावना अतिशय मुलभूत स्वरूपात दोघींच्याही मनात आणि आयुष्यात जागोजाग पसरलेली दिसते. आयुष्य क्षणोक्षणी विस्कटत असतानाही इतकी स्वसमर्पित आणि प्रगाढ भावना परक्याबाबत उमलणं हे गोनीदा आणि चिंत्र्यंच करू जाणोत, नाही का? आणि इतकं असूनही ह्या दोघी किंवा त्यांच्याद्वारे त्यांचे लेखकही कधीही उगाच प्रबोधनाचे डोस पाजत नाहीत. जे आणि जसं घडतं ते उघड्या डोळ्यांनी मांडत जातात फक्त.

कोकणी लहेजा, चालीरिती, गावगाडा, संस्कृतींचे उल्लेख दोन्हीकडे अगदी मुळातून उगवल्यासारखे विणले गेलेत. चिंत्र्यं, श्रीना, हमोंसारखे लेखक तर तिथेच शिकले, वाढले. पण गोनीदा, देशावर वाढल्यानंतर कोकणाने भुरळ घातली म्हणून कोकणी जीवनाचा सखोल अभ्यास केल्याचा उल्लेख प्रस्तावनेत करतात. हा अभ्यासही इतका पक्का केला त्यांनी की कोकणात देशावरचं रोप लावल्यासारखं मुळीच वाटत नाही. आयुष्यांच्या शोकांतिका कोकणांत ताड-माडांइतक्याच विपुल असाव्यात असं कधीकधी वाटून येतं. चानी आणि शितू वाचताना आपल्यांत जसा निसर्गरम्य कोकण भिनतो तसंच त्या दोघींची व्यक्तित्वेही. पुस्तक वाचताना राहून राहून त्यांच्याविषयी जे अनामिक भाव दाटून येतात ते प्रेम ह्या संज्ञेखाली एकत्र करता येतीलही कदाचित पण ते प्रेम नाही. इस रिश्ते को नाम न दो इल्जाम न दो असं काहीतरी.

तूर्तास इतकंच.

९ एप्रिल १२

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s