05
सप्टेंबर
12

चम्या -२

 चम्या -१

“हगर्‍या… हगर्‍याव, कॉलनीतली सगळी पोरं कुठे गेली रे…?”, चम्या. “कॉलनी? तू पण का त्या पलिकडल्या बंगलेवाल्यांवाणी कॉलनी कॉलनी करायला लागला का?”, लोण्या करवादला. “का रे? कॉलनी फक्त बंगलेवाल्यांचीच असते का? अरे आपली पण घरंच आहेत ना.”, चम्या वैतागला आणि, “अरे पण सगळे गेले कुठे?”, पुन्हा विचारता झाला. “पारावर कोणी संन्यासी आलाय म्हणे. काय काय सांगून र्‍हायलाय. सगळे गेलेत तिकडेच. आणि मला मात्र आई बोलली की असं संन्याशाकडं वगैरे जात नसतात. गुमान इथंच र्‍हाय म्हणे.”, लोण्या. यावर चम्याच्या “का नाही जायचं संन्याशाकडे?” ह्या प्रश्नाला लोण्याने नुस्तं खांदे उडवून उत्तर दिलं. चम्या जे काय समजायचं ते समजला. मग ते दोघंच कॅचम्‌कॅच खेळू लागले.
आज खेळायला दोघंच होते. त्यामुळे अगदी मन भरेपर्यंत बॅटिंग आणि बॉलिंग प्रॅक्टिस करून झाली. दोघंही खेळून थकल्यावर घामेजलेल्या अंगाने लोण्याच्या दाराबाहेर सदैव ठेऊनच दिलेल्या खाटेवर जाऊन लोळले तेव्हा चेहर्‍यावर खास ठेवणीतलं हसू होतं. आणि चेहर्‍यावर “हुश्श!” असा भाव. कितीतरी वेळ बोलत कुणीच नव्हतं फक्त दूरवरून संन्याशाच्या बोलण्याचे फिकट आवाज येत होते. लोण्याच्या घरी अजून फ्रीज नव्हता. त्यामुळे चम्या कोरड्याठाक घसा घेऊन तसाच घरी आला आणि बाबांनी दिवाळीत आणलेल्या सेकंडहॅंड फ्रीजमधून पाण्याची माफक थंड झालेली बाटली सरळ तोंडाला लावली. घटाघटा पाणी पिऊन जीव शांत झाला तेव्हा जरा चम्याला घराचं भान आलं. दार नुसतंच लोटून ठेवलं होतं. तो ते सरळ ढकलूनच आत आला होता, नेहमीप्रमाणे. चम्या परत बाहेरच्या खोलीत आला आणि त्याने खात्री करून घेतली. भर संध्याकाळी चक्क टिव्ही चालू नव्हता आणि टिव्हीसमोर पलंगावर आजीही नव्हती. चम्या परत आत आला. स्वयंपाकघरात आईसुद्धा नव्हती. चम्या नाही म्हटलं तरी थोडा बावचळलाच. त्याला अगदी बाहेरच्या खोलीतही जावं वाटेना; तो तिथेच ओट्याला टेकून उभा राहिला.
फार वेळ कदाचित नसावा गेला. दार ढकलून चम्याची आई आली आत. डोक्याला हात लावून बसली. थकल्यासारखी वाटत होती. सूक्ष्म थरथरत होती. चम्याला त्याही परिस्थितीत सरांनी सांगितलेला शब्द बरोबर आठवल्याचा आनंद झाला. मग चम्या आईच्या समोर जाऊन बसला. आई म्हणाली, “चम्या जा. पारावर ते संन्याशीबाबा आलेत त्यांना नमस्कार करून ये जा.”. “संन्यासी?”, चम्या. “हो. जा नमस्कार ये करून.”, आई. “आज्जी कुठे गेली?”, चम्या. “आता जातो का?”, आई. “आज्जीपण त्या संन्याशाकडे गेली, टिव्ही सिरीयल सोडून?”, चम्या. “आता जा रे. विचारायचं ते त्यांनाच विचार आता… जातो का?”, आई, वैतागून.


लोण्याची आई घरी आल्या आल्या, “काय खरं नाही ह्या संन्याशाचं… पिसाटानं आल्या आल्या म्हातारी नादाला लावली एक.”…


चम्या नागड्यानं रांगायचा तेव्हापासून त्याला पहात असलेल्या पानवाल्याला, त्याचा टपरीला टेकून आज का उभा आहे ह्याचं कुतूहलही वाटलं नाही आणि त्यानं चम्याला हटकलंही नाही. थोड्या वेळानं प्रवचन संपलं आणि संन्यासीबुवांना नमस्कार करणार्‍यांची रीघ लागली. त्याच रीघेत घुसून चम्यानेही नमस्कारकर्म आटोपलं आणि तो घराकडे पळत सुटला.
घरी एव्हाना आईचा स्वयंपाक होत आला होता. ते पाहून चम्याला आपण टपरीशी टेकून किती वेळ घालवला याची जाणिव झाली. तो चपापला. आज बाबाही घरीच थांबले होते. गोड वासाचा पत्ताही तर नव्हता. चम्या आपला साळसूदपणे लगेच अभ्यासाला बसला. थोड्यावेळानं आईने पानं वाढायला घेतली तसं चम्याचं साळसूद अभ्यासावरचं लक्ष उडालं. “जेवायला ये रे…” बाबांनी हाक घातली तसं चम्याने पुस्तक दप्तरावर टाकून आत झेप घेतली. वाढून झालं तसं दोघांनीही जेवायला सुरूवातच केली. “आई, आज्जी?”, चम्या. आईने न ऐकल्यासारखं केलं आणि जेवू लागली. “आजी संन्याशीबाबांची शेवा करायला गेलीये हां. तिकडेच जेवेल ती. जेव तू.”, बाबाच बोलते झाले. ह्या इतक्या उत्तराने चम्याचं तात्कालिक का होईना पण समाधान झालं. पोट भरू लागताच चम्याचं कुतूहल जागृत होऊ लागलं. चम्याने धीर करून सरळ बाबांकडेच मोर्चा वळवला. “बाबा आजी संन्याशीबाबांचे पाय चेपून देणार?”, चम्या. चम्याच्या बाबांनी चम्याच्या आईकडे प्रचंड कन्फ्यूज होऊन पाहिलं. चम्याच्या आईला तर काय करावं उमजेना. शेवटी बाबांनीच धीर करून चम्याला प्रश्न केला, “आत्ता तू गेलास तेव्हा पाय दाबून देत होती का?”. चम्या खणखणीत “नाही!”. “मग?”, बाबा. “आई नाही का तुमचे पाय दाबून देत रोज रात्री माझं पाठांतर घेताना… ती पण तुमची सेवा करते ना…”… “हो पाय दाबणार. जेव तू आता.” चम्याची आई चम्यावर उगाच करवादली. “अजून काय काय सेवा करणारेत देव जाणे.”, आई. “अं?”, चम्या. आजी त्या रात्री घरी आलीच नाही. चम्या सकाळी उठला तेव्हा ही ती आलेली नव्हती. चम्याला आजीची आठवण येऊ लागली.
“आई आज्जी कधी येणार?” चम्या. “लवकर दात घास आणि मागल्या गल्लीतल्या बामनिनीकडून फुलं घेऊन ये.”, आईने विषयच टाळला. चम्याला तिकडे जाणं आवडे. त्याच्या वस्तीत वस्तीला असणार्‍या गटारगंगेच्या सर्वव्यापी वासापेक्षा बामनिनीच्या घरातला फुलांचा मिश्र वास त्याला बरा वाटे. तोंडातला पेस्ट आणि पाण्याचा फेस मागील दारच्या चिखलात थुंकून चम्या गल्लीत धावत सुटला. “गरीब झाली तरी इतर बायकांसारखी धुण्याभांड्यांची मेहनतीची कामं बामनिनीला जमंना. शिवाय अशी गोरी घारी मुलगी घरात… जाऊ द्या हो. देवाला चांगली ताजी फुलं मिळतात ना… खूप झालं.”, धावता धावता चम्याला बामनिनीबद्दलचं आई आणि आज्जीचं जुनाट संभाषण आठवलं. “ए गोरी ताई, तू पुस्तकदादाचा फोटो का बघत्येस?”, चम्या दम खात बोलला. “क क.. काही नाही. काय देऊ तुला? गुलाब चाफा की दूर्वा?”, गोर्‍या ताईने विचारलं. “फुलपुडी दे २ रूपयांची.”, चम्या. ती शांतपणे एकेक फूल बदामाच्या अर्धवट वाळक्या पानात टाकत फुलपुडी बांधू लागली. वरून चार दूर्वा आणि तुळशीची पानं टाकली अन्‌ फुलपुडी बांधायला घेतली. “पुस्तकदादा तुला भेटतो का गं?”, चम्याला आता रहावलंच नाही. “नाही रे. कसा भेटेल?… तत्वांना मुरड घालायला नकार दिला आणि…”, गोरी ताई. चम्याला पांढरा गुलाब हातात घेतलेली ताई फारच उदास वाटली. मग तो निघालाच तिकडून, उद्या मराठीच्या सरांना तत्वांना मुरड म्हणजे काय ते विचारयचंच असं मनाशी ठरवत.


“ए तू गेला नव्हतास ना त्या संन्याशाकडे?, लोण्या. “नमस्कार केला फक्त, आईनेच पाठवलं”, चम्या. “अरे तुला माहितीये का?, एक म्हातारी नादाला लावली त्यानं.”, लोण्या आवाज शक्य तितका हळू करत बोलला. “म्हणजे काय?”, चम्यानेही तशाच हळू आवाजात विचारलं. लोण्याने तोंड वाकडं करून खांदे उडवले.
चम्या आज खूप दिवसांनी लायब्ररीत गेला. पुस्तकांच्या कोनाड्यात धूळ साठली होती. कोनाड्यावर लावलेल्या समाजसेवकाच्या फोटोला मात्र ताज्या फुलांचा हार होता. चम्याने त्याचं आवडतं अकबर बिरबलाचं पुस्तक उचललं. दोन तीन सटासट आलेल्या शिंकांनंतर तो वाचू लागला. क्षुल्लक चुकीमुळे राजाने सुनावलेल्या शिक्षेला भिऊन एक माणूस बिरबलाकडे मदतीची याचना करतो आणि बिरबल त्याला वाचवतो अशी ती एक कथा होती. चम्याला प्रश्न पडला. ती शिक्षा झाली असती तर तो मेला असता. मग तो नक्की घाबरला कशाला? स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीला, राजाला, शिक्षेला की मरणाला? झालं, चम्याचं वाचनावरचं लक्ष उडालं.


“अरे ऐका माझं. माझ्यासारख्या संन्याशाच्या नादाला लागू नका.”, संन्याशी. “नाही हो बुवा असं म्हणू नका… थोडं तरी ज्ञानामृत द्याच आम्हाला.”, काही लोक. “तुम्ही लोक ऐकायचे नाहीत; बास झालं मांड्या चेपणं आता समोर जाऊन बसा बायकांच्यात.”, संन्याशी आजीवर उगाच करवादला. आजी पदर सावरीत जमलेल्या चार पाच बायांच्या घोळक्यात जाऊन बसली.
“तर लोकहो, तुम्ही आग्रह केलाच आहे तर मरणावर बोलूया म्हणतो. तर मरण, ज्याक्षणी तुम्ही श्वास घेतला त्या क्षणीच ठरलं की घेतला श्वास शरीराबाहेर पडणार. आणि जेव्हा शरीराबाहेर पडलेला श्वास शेवटचा ठरतो. ते असतं मरण… मरण. तर बोला कोणाला मरायचंय? बोल की रे भाड्या… बोला की… कोणाला मरायचं नाहीये सांगा आता?”, संन्याशाचा आवाज वाढू लागला. हळूहळू एका पाठोपाठ एक हात वर येऊ लागले. संन्याशाचे डोळे लाल झाले. “गांड्याहो मरायचं नाही म्हणता तुम्हाला?…” संन्याशी उठला आणि पुरूषांच्यात घुसून दिसेल त्याला मारू लागला. “भोसड्याहो जनमले कशाला जर मरायचं नाही तर… मरायचं नाही म्हणे ह्या आईघाल्यांना…”, पुरूषांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद देता देता संन्याशाचं लक्ष आजीकडे गेलं. संन्याशाला काहीच जमेना. तो नुसताच रागाने थरथरू लागला. “मरणार मरणाऽऽर तुम्ही सगळे मरणार एक दिवस…” संन्याशी परत जागेवर जाऊन बसला. “तुम्ही मराल तिकडे तुमच्या गांडू जगण्याच्या स्मृतीशिळा बांधल्या जातील. पण जिथे मी मरेन तिथे माझ्या मरणालाही व्यापून राहीले तो अनंत जीवनजल्लोष…” लोकं दुखरे अवयव चेपत संन्याशाचं बोलणं अद्भूत होऊन ऐकत होते. “बोला मग मरणार का?ऽऽऽ” ह्या खणखणीत प्रश्नावर लोकांचा मुखदुर्बळ हो निघाले.
“पण मरण म्हणजे काय?” एव्हाना आजीजवळ येऊन बसलेल्या चम्याने धीर करून प्रश्न केला. थेट प्रश्न श्रोत्यांतून आणि तो ही लहान मुलाकडून आल्याने संन्याशी सुखावला. “मरण म्हणजे शेवट. ह्या अनंत अवघ्या जगताच्या तुम्हाला होणार्‍या अनुभूतीचा फक्त शेवट, मरण. जगताची तुम्हाला होणारी अनुभूती मरते. पण म्हणून जग मरत नाही. तुमच्यातून हे जग आणि जगातून तुम्ही मरता. पण एकट्यानं जग जगतं तसे तुम्हीही जगताच. कोणीतरी म्हणून गेलंय मरणात खरोखर जग जगते ते खोटं नाहीये.” इतकं बोलून संन्याशी एकवार चम्याकडे नजर टाकतो. चम्या आवंढा गिळतो.


“मरण तिथे असतं जिथे तुमच्या सर्व चेतना, आकांक्षा, हेवेदावे आणि वासना संपून जातात. नीट लक्ष द्या लोकहो. मी चेतना संपतील म्हटलं, ज्ञान नाही. आकांक्षा संपतील, आशा नाही. हेवेदावे संपतील, रागलोभ नाही. आणि वासनाही संपेल, प्रेम नाही. हेवेदाव्यांपायी कोर्टकज्जे केले जातात. वासनेपायी बायकांवर हात टाकले जातात. आणि एकदा का तुम्हाला मरण आलं की कोर्टकज्जे संपतात. पण त्यापायी समोरच्याच्या मनावर तुम्ही पाडलेले ओरखडे? बाईच्या मनात तुम्ही उत्पन्न केलेली भिती? घृणा??” सगळ्या श्रोत्यांवर मोकाट फिरणारी संन्याशी नजर आजीच्या पाणावल्या डोळ्यात अडकते. क्षणभर काळ थांबल्यासारखा होतो. “हा सगळा तुम्ही निर्मिलेला कचरा इथेच राहील की हो!, संन्याशी अडकल्या नजरेनेच बोलत रहातो. “तुम्हाला साक्षात्‌ मरण आलं तरी तुमचा इथला कारभार आटपत नाहीच. त्या निर्मिकानं जेव्हा सृष्टी निर्मिली तेव्हा हे अभिप्रेत नव्हतं त्याला तुमच्या मरणाकडून.

जाऊ द्या सर्व
मरणालागुनी
तरी जग धावे
पुढे पुढे

अडू नये काही
आपुल्याशिवाय
जगावे नेटके
शोभा म्हणे”

शोभा म्हणे असं शेवट संन्याशानं करताच एका उत्साही माणसानं शोभानाथ संन्यासी की… अशी आरोळी ठोकली आणि एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तिला जय असा लगोलग प्रतिसाद मिळाला. संन्याशी जे काय सांगत होता ते लोकांना खरोखर कितपत कळत होतं देव जाणे. त्यामुळे संन्याशानं सुद्धा श्लोकांचाच आधार घेत आपली बडबड पुढे रेटायला सुरूवात केली. मारूतीस्तोत्राच्या चालीत स्वतःचे शब्द घालून तो म्हणू लागला.

“जगू द्यावे सकळाला
अत्याचार नये करू
श्रीमंत व्हावे कष्टाने
देवाला मानुनी जगू

भ्रष्टाचार जो करतो
शिव्याशाप तो घेतसे
उन्मादाने जगताना
हाय तो लागुनी मरे

तुमच्या आयुष्याइतकंच तुमचं मरणही महत्वाचं आहे. तुम्ही कसं मरता यापेक्षा का मरता हे महत्वाचं. तुम्ही तुमच्या वासनेपायी, लालसेपायी मरणार; आकांक्षापाठी धावताना थकून भागून मरणार? चूक आहे. निर्मिकाचा तुम्ही अपमान करताय त्या. पण हां, तुम्हाला तुमच्या तत्वांसाठी, माणुसकीसाठी, सर्वांच्या भल्यासाठी झटताना मरण आलं तर मात्र निर्मिकाच्याही आदराला तुम्ही पात्र ठराल. मरणानंतर साक्षात त्याने, त्या निर्मिकाने तुम्हाला खुल्या दिलाने कवटाळलं असेल.”
हे ऐकून गोर्‍या ताईला रडू आवरलं नाही.

“निर्मिका रे दयाघना
विश्वरूपा जगोद्गाता
तुझ्या आशिर्वादाने रे
सदा सत्कर्म घडू दे..

देवा… सर्वांना सुखरूप मरण दे रे… देवा…” अशी हाळी घालून संन्यासी ढसाढसा रडू लागला. लोकं बावरून गेले… आजी उठून संन्याशाच्या जवळ गेली तसा तो तिच्या कमरेला मिठी मारून रडू लागला.

चम्या -३

Advertisements

6 Responses to “चम्या -२”


 1. 1 mayuri mandlik
  सप्टेंबर 5, 2012 येथे 10:02 म.उ.

  masta vatata vachtana,,,,soppya pn subak bhashet lihilay re…awdya….:)

 2. 2 .
  सप्टेंबर 6, 2012 येथे 1:14 म.उ.

  थांबलं का की चालूए..! एकटी वळू वळत गंगा दिसतेय, पण इथे हललं मात्र..


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s


एकूण वाचक

 • 32,576 वाचक!

मनसोक्त फिरा इथे…

.....................................................

लोकप्रिय लेखन

जुना खजिना

भाषावार वर्गीकरण

माझे इतर उद्योग!

.....................................................

Flickr Photos

L'INK'

Mundane Things in Everyday Life 9

An Evening Tea

More Photos

चेहरापुस्तकावर Alhad M Photography

थोडक्यात महत्वाचे…

.....................................................

इथून उचलेगिरी करू नये!

ब्लॉगवर वाचकांचे हार्दिक स्वागत. ब्लॉगवर फिरायला, वाचायला, प्रतिक्रिया देण्याला कसलीही आडकाठी नाही. पण या ब्लॉगवरील माझे लेखन मेल, ई बुक, फेबु नोट्स, वेबसाईट, फेबु/ऑर्कुट/गूगल/याहू व तत्सम आंतरजालीय समुदायांवर किंवा पुस्तकात, मासिकात व तत्सम कोणत्याही वस्तूत पुनःप्रकाशित/पोस्ट करायचे असल्यास माझी लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी तशी कमेंट देऊन माझ्याशी संपर्क साधू शकता.

ता.क.: आवडलेल्या लेखनाची/ब्लॉगची लिंक देऊन नवीन वाचकांना माझ्या ब्लॉगपर्यंत पोचवण्यास मात्र पूर्ण मुभा आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

कुठून कुठून येतात लोकं…

मी मराठीब्लॉग्ज.नेटवर

मी मराठीमंडळीवर

Marathi Mandali!

मी मराठीसूचीवर

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मी मराठी कॉर्नरवर

Marathi

मी ईंडीब्लॉगरवर

alhadmahabal.wordpress.com
53/100

काही आवडते ब्लॉग्ज…

.....................................................

%d bloggers like this: