चम्या -३

चम्या -१

चम्या -२

“ए चम्या… चम्याव…”, लोण्या हाक मारत होता चम्या आपल्याच धुंदीत मातीत रेघा काढत बसला होता. “का रे असा का बसलाय?”, लोण्या त्याच्या डोक्यावर टपली मारत करवादला. “उगाच…”, चम्या त्याचा हात झटकून उठला. “सरांना एक शब्द विचारायचा होता.”, चम्या. “कुठला शब्द?, लोण्या.” “तत्वांना मुरड”, चम्या. “म्हणजे काय?”, लोण्या. “अरे तेच तर विचारायचंय ना!”, चम्या. “चल त्यापेक्षा तुझ्या त्या लायब्रीत जाऊ”, लोण्या. चम्या अविश्वासाने, “लोण्या साल्या सुधारलासच की एकदम! चल जाऊ.”
“गोरी ताई तू इकडे?”, चम्या. “का? मी यायचं नाही तुमच्या लायब्रीत?”, गोरी ताई. चम्या वैतागून, “अरे तुम्ही सगळे लायब्री का म्हणता? ला य ब्र री असं आहे.”. “हो माहितीये तुलाच सगळं येतं ते. बोल काय हवंय?”, गोरी ताई. “आम्हाला एका मराठी शब्दाचा अर्थ शोधायचाय. डिक्शनरी दे.”, लोण्या. “बघते आहे का.”, गोरी ताई. “तू झाडलंस सगळं?”, चम्या. “हो मग. तुम्हाला पुस्तकं वाचायला हवीत नुसती. ती नीट ठेवायची कुणी… फोटोतून बाहेर नाही येणारे आता तुझा दादा.”, गोरी ताई पटकन बोलून गेली आणि अडखळली. पुस्तकांच्या कोनाड्यालाच डोकं टेकवून क्षण दोन क्षण शांत उभी राहिली. काही वेळानं ती पुन्हा डिक्शनरी शोधू लागली तेव्हा वेळेचा अंदाज घेत बर्‍याच वेळापासून मनात असलेला प्रश्न चम्याने विचारला, “ताई, तू दादाचं काम करणार आता?”. “हो. ही घे डिक्शनरी.” लोण्या कधी नव्हे ते फारच उत्साही होता. तो लगेच मुरड शोधायला पानं उलटू लागला. “सगळं काम करणार?”, चम्याचं कुतूहल अनएण्डिंग! “हो. ठरवलं तर तसंच आहे. हे घे. इथे नाव लिही तुझं.”. चम्या नाव लिहीतो. “आम्ही बाहेर बसतो शब्द शोधायला.”, चम्या. “कशाला? बसा की इथेच. मी काय खाते का तुम्हाला?”, गोरी ताई. “नाही, नाही तसं नाही. ते…”, चम्याला पटकन सुचे ना काही, “बाहेर उजेड आहे ना… इकडे आत अंधार आहे.” “हो. अंधारात बसून वाचलं की डोळे खराब होतात असं आई म्हणत होती.”, लोण्यानेही तत्परतेने चम्याला पुस्ती जोडली. गोर्‍या ताईचं लक्ष छताला टांगलेल्या एकुलत्या एका पिवळ्या बल्बकडे गेलं जळमटांनी अगदी झाकून गेल्यासारखा झाला होता. टेबलफॅनचीही अवस्था काही वेगळी नव्हती. गोर्‍या ताईनं अस्वस्थ सुस्कारा सोडला. गोर्‍या ताईचं लक्ष नाहीसं बघून डिक्शनरीसह दोघंही बाहेर पडले.
चम्या आणि लोण्या बाहेर बसून फार वेळ झाला नव्हता तसा. संध्याकाळ होत आली होती. काही जण समाजसेवकाच्या त्या खोलीत शिरले. शेवटच्यानं चम्याच्या हातातली डिक्शनरी खेचून घेतली आणि त्यांना हुसकावून लावलं. चम्या न हलता तिथेच उभा राहिला. “जातो का बे आता?”, पोरगा. “नाही.”, चम्या. हे ऐकलं तशी त्या पोरानं उलट्या हाताने चम्याच्या कानाखाली लगावली. चम्याला लागलं. तो घाबरला. जीव तोडून पळू लागला. त्याच्यापाठोपाठ लोण्याही. थेट घराशी येऊनच चम्या दम खात उभा राहिला. “का रे असा पळाला एकदम. मला वाटलं मारतो तू त्याला परत.”, लोण्या दम खात बोलला. “हं”, चम्या. “मारलं का नाही मग?”, लोण्या फारच थकलेल्या आवाजात. “तत्वांना मुरड घातली.”, चम्या.
“फुलं पानं विकायची सोडली म्हणे तुम्ही?”, माणूस. “हो. ह्या पुस्तकांचं काम बघतेय मी आता. हे घ्या. विनोबांची गीताई वाचा जरा.”, गोरी ताई. ” तुम्ही असताना अजून ती गीता कशाला हो?”, माणूस. “कानफाट फोडीन.”, गोरी ताई. “श्श… अहिंसा ताई अहिंसा… प्च. मी सांगतो काही उपयोग होत नाही हो… नाही रागवू नका. नुसता स्वानुभव सांगतोय झालं… पुस्तकं वगैरे वाटताय. लोकांना शाणं करताय…”, माणूस. “हो. वाटतेय पुस्तकं. तुला काय करायचंय?”, गोरी ताई. “काही नाही. कुठे काय? जरा काळजी घ्या इतकंच सांगणं… भेटूच मग पुन्हा कधी… सांच्याला.” माणूस. गोरी ताई काय बोलावं हे न सुचून नुसतंच पुस्तक टेबलवर आपटते.
“का रे मायला चम्या रडतो कशाला संध्याकाळचा?”, चम्याचे बाबा कामावरून घरी येत होते. नेहमीचा गोड वास आजही नव्हता. “जा रे घरदार नाही का तुला? अभ्यास कर जा.”, चम्याचे बाबा लोण्याला ओरडताच त्याने लगेच काढता पाय घेतला. “जा थंड पाणी पी. मला बी दे. अभ्यास कर आणि खूप हां. जा.”, बाबा चम्याला शक्य तितक्या मृदू आवाजात बोलले. चम्या आत जायला उठणार तितक्यात त्याला घराकडे येत असलेली त्याची आज्जी दिसली. “बाबा, आज्जी आली.” असं ओरडतच तो तिच्याकडे पळाला. आजीचा हात धरून नीट घरापर्यंत परत आला. चम्याच्या उत्साही आवाज त्याच्या आईला पार आतवर ऐकू गेला होता. तरी स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावरून सासूबाईंनी घरात पाऊल टाकल्याचं प्रत्यक्ष बघितल्यावरंच तिच्या जीवात जीव आला. लगोलग थंड पाणी घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. इतक्या वेळात चम्याच्या अखंड बडबडीला उसंत म्हणून नव्हती. दोनच घोटात ग्लासभर पाण्याचा फडशा पाडल्यावर चम्याला बोलायला पुन्हा हुरूप आला. तो उत्साहाने म्हणाला, “बाबा तुम्हाला माहितीये त्या संन्याशीबाबांचं आणि आपल्या आजीचं नाव एकच आहे.”. हे ऐकून चम्याच्या बाबांना काही सुचेना. ते नुसतेच डोळे मोठमोठे करून एकदा त्यांच्या आईकडे आणि एकदा बायकोकडे बघत बसले. शेवटी आईनेच धीर करून जीभ पुढे रेटली. “अजून काय म्हणाले रे ते?”, चम्याला विचारलं. “ते म्हणाले मरण चांगलं असतं. तुम्हाला मरण आलं तरी कोणाचं काही अडत नाही.”, चम्या. “गप मेल्या उगाच काहीतरी बडबडू नकोस. नको ते ऐकून येतो झालं. चल अभ्यासाला बस.”, असं ओरडून आईने त्याला खसकन्‌ आजीच्या मांडीवरून ओढून काढलं आणि अभ्यासाला आत पिटाळलं. चम्याचे बाबा डोक्याला हात लावून गप्प त्यांच्या आईच्या पायाशी बसले होते.


“मग म्हणून काय तू पण मरणार?”, लोण्या. “मग मेल्यावर काय होतं ते नाहीतर कसं कळणार?”, चम्या. “हां…”, लोण्या. “तसंही मेल्यावर कोणाचं काही अडत नाही रे.”, चम्या. “म्हणजे काय तू मेल्यावर माझं काहीच अडणार नाही?”, लोण्या शाळेत जाता जाता रस्त्यात एकदम थांबलाच. “अं… हो… अं… ते… अरे पण ते संन्यासीबाबा म्हणाले तसं तेव्हा…”, चम्याही अडखळला. “तो संन्यासी? ए तुला माहिती नाही का त्यानी म्हातारी नादाला लावली म्हणे एक…”, लोण्या. “अरे पण म्हातारी नादाला लावणं म्हणजे काय?”, चम्या ओरडलाच. लोण्याने नुसतेच खांदे उडवले आणि दोघं शाळेकडे चालू लागले.
शाळेतून आल्याआल्या निव्वळ त्या ग्लासभर माफक थंड पाण्याच्या जोरावर आजीशी चम्याची बडबड अगदी उत्साहात चालू होती. आईनेच शेवटी ओरडून चम्याला पाय धुवायला आत पाठवलं तेव्हाच तो आजीजवळून उठला. चम्या आत गेला तशी अतिशांत शांतता तिथे पसरली… घरी परत आल्यास आजी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. चम्याचे बाबा आज कामावर गेलेच नाहीत. कधीचे ते तिच्या पायाशी बसून होते. चम्या बिचारा अगदी गप्पपणे अभ्यासाला बसला. त्याचा अभ्यास होत आला तशी चुळबूळ सुरू झाली. शेवटी आईच्या असहाय पायाशी गप्प बसून असलेल्या तिच्या मुलाच्याही पोटातली भूक बोलू लागलीच. तसे चम्याचे बाबा उठून आत गेले. आतून सपासप चेहर्‍यावर पाणी मारण्याचा आवाज अनेकदा आला. काही वेळानं चम्याची आई जेवणाचं ताट पुढ्यात ठेऊन गेली. घरातल्या सगळ्यांची जेवणं झाली तेव्हा आजीचं ताट स्वच्छ संपलं होतं आणि आजी गाढ झोपली होत्या. टिव्ही सिरीयल्स आजही लागल्या नाहीत. “आजीनं टिव्हीला वाळीत टाकलं”, ज्ञानेश्वरांनंतर थेट आपला टिव्हीच आज वाळीत गेला ह्या विचाराने चम्याला फार मजा वाटली; हे लोण्याला सांगायची स्वप्नं पहात चम्या बाहेरच्या खोलीत झोपी गेला.
चम्या झोपला. आजी आल्याच्या आनंदात त्याच्या स्वतःच्या आनंदी दुनीयेत निमग्न होऊन गाढ झोपी गेला. आजकाल आई त्याला फारशी बोलत नसे. एकूणातच गप्प गप्प असे. आईच्या लक्षातच नाही की काय असं त्याला वाटून तो आईला अभ्यासाबद्दल, शाळेबद्दल खूप काही सांगे, मग ते मात्र त्याची आई शांतपणे ऐकून घेई. असंच एकदा आईला सगळा अभ्यास केल्याचं सांगितल्यावर आईने त्याच्या गालावरून मायेने हात फिरवला होता. भाकरीचं पीठ त्याच्या गालाला लागल्याच आईला कळलंच नाही. चम्यानेही हे गोड गुपित एकदम सांभाळून ठेवलं होतं रात्रभर… चम्याला असं कायकाय आठवताना गाढ झोप लागली. बाहेर म्युन्सिपाल्टीचा पिवळा दिवा मिणमिणत होता. नाल्यापलिकडच्या कॉलनीतले स्ट्रीटलाईट्स झगमगत होते. संन्याशाचे कवडी डोळे त्याच्यापुढच्या धगधगते निखार्‍यांगत लाल झाले होते. संन्याशी आगीत टक लावून काय बघत होता कोण जाणे. गोरी ताई सगळंच आवरून, थकून पुस्तकवाल्या दादाच्या खोलीत, त्याच्याच खाटेवर आडवी झाली. तिने अगदी हौसेनं त्याला स्टुडिओत नेऊन दोघांचा एक एकत्र फोटो काढून घेतला होता. त्या फोटोला कवटाळून कसंबसं रडू आवरू लागली. काही अंमळ शिवराळ आवाज तिने बाहेरून ऐकले आणि खोलीच्या दारावर जोरदार थाप पडली. चम्याला स्वप्न पडलं, पतंगांचं!
शाळेत त्याच्या सरांनी मुलांना ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितली तशीच तो आता सरांना वाळीतल्या टिव्हीची गोष्ट सांगत होता. सर मूल होऊन ऐकत होते. आकाशात भरपूर पतंग भिरभिरत होते. मग चम्या गोर्‍या ताईकडे गेला. तिच्याकडून पांढरा गुलाब घेतला, पतंगात खोवला. साधासुधा नव्हता तो पतंग, पांढराशुभ्र राजा पतंग होता! वार्‍यावर स्वार होत तो पतंग उंचच उंच गेला. इतका उंच गेला की तिथे लोण्याचाही पतंग पोचला नसता. सगळ्या निरुद्देश काटाकाटीच्या वर गेला चम्याचा पतंग, आकाशभर फडफडला, विहरला मग आकाशाकडून काही निरोप घेऊन आल्यासारखा एकदम दूर क्षितीजावर दिसला. चम्याकडे तो एकच पतंग होता. चम्याने घाबरून तो पतंग सरसर खेचून घ्यायला सुरूवात केली. पतंग जसा त्याने लॅण्ड केला तसा गोर्‍या ताईने तो उचलला; त्यावर मगाशी खोवलेला पांढरा गुलाब आता तिथे नव्हता… मग अचानक गोरी ताई हातपाय झाडत रडू ओरडू का लागली ते मात्र चम्याला कळलं नाही. तो तिथून पटकन खाली आला. लोण्याच्या ताटलीतलं लोणी त्याने तोंडात टाकलं. आकाश फडफडत्या पतंगांनी जणू झाकोळलं होतं. आकाशाला कुठे कळते पतंगांच्या काटाकाटीतली मजा? त्या पतंगांनी आकाशाला गुदगुल्या थोडीच होतात. ते कबूतर आपलं लोकांनी भिरकावलेले आयते दाणे पचवायला उगंच उडत होतं. नशीब आडवं आलं; समोरचा उभा सरकता धागा अगदी शेवटच्या क्षणी डोळ्याशी चमकला. तोवर उशीर झाला होता. चम्याला त्याचा पतंग दिसला तोवर ते कबूतर कुठे नामशेषही उरलं नव्हतं. तत्वाला मुरड घातली नाही तरी मरण यायचं ते आलंच च्यामारी. कोंबडीला दुकानात मारतात तेव्हा किती लागतं ते माहित नाही. ह्या कबूतराला तरी विचारता आलं असतं पण तेही नाही जमलं. पुस्तकवाला दादा, नाहीतर गोर्‍या ताईला तरी कळेल का ह्यातलं काही? तो लोण्या म्हणतो जसं काही त्याचं अडेल मी मेल्यावर, संन्याशीबाबा म्हणतात नाही…
मध्यरात्र संपलेली आणि पहाट अजून झालेली नाही अशा विचित्र वेळी डोळ्यावर पडलेल्या प्रखर प्रकाशाने चम्याला जाग आली. मध्यरात्री तीनचा सुमार असावा साधारण. त्याच्या डोळ्यावरच कोणीतरी अचानक लावलेली ट्यूब भगभगत होती. बाहेरून गोंधळाचे आवाज येत होते. चम्याला त्याच्या अर्धवट झोपेतच अचानक रडू फुटू लागलं. त्याला एकदम आज्जीच्या कुशीत जाऊन रडावसं वाटू लागलं. रात्री झोपताना बाबा मधलं दार लावून घेत; आणि आत शांत झोपलेली आई चम्याला एकदम दूर गेल्यासारखी भासू लागे. अशा वेळी म्हणून मग त्याला आज्जी हवी असे. आत्ताही तो आज्जीचं नाव घेत रडत उठून बसला पण लगोलग आईनेच येऊन त्याला कुशीत घेतलं आणि थोपटू लागली. कुणीतरी लगोलग ती भगभगती ट्यूब बंद केली. आईने मायेने कुशीत घट्ट दाबून घेतल्याने बाहेरचा गोंधळ त्याच्या कानावर पडेनासा झाला. अन्‌ चम्याला पुन्हा शांत झोप लागली.
चम्या शांत झोपत होता तेव्हा संन्यासी सोडून गेलेल्या गरम निखार्‍यांवरच चम्याचे बाबा त्या संन्याशाची झोपडी जाळत होते… त्या झोपडीत संन्याशाने ठेवलं तरी काय होतं देव जाणे. पार आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करणार्‍या हिरवट पिवळ्या ज्वाळा लगोलग भडकू लागल्या. संन्याशी जसा आला तसा रिकाम्या हातांनीच गेला हे काही तितकसं खरं नव्हतं. पलिकडे त्या हिरवट पिवळ्या ज्वाळा आणि अलिकडे चम्याचे बाबा भणंग आरडाओरडा करत होते. रोज देशी पिऊनही घरी शांतपणे चालत येणार्‍या ह्या माणसाचा आजचा थयथयाट मात्र थांबवायची कुणात हिंमत नव्हती. एका क्षणी कोलमडून जाऊन चम्याच्या बाबांनी स्वतःला जमिनीवर ढकलून दिलं आणि हमसून हमसून रडू लागले. रक्ताळलेलं कपाळ मातीवर घासू लागले. इकडे चम्याच्या आईनं चम्याला हळूवारपणे मांडीवरून खाली ठेवलं. अंगावरची गोधडी त्याच्या कानांवरून घातली आणि आकांताने बाहेर धावत सुटली.
चम्याची गोधडी गोर्‍या ताईच्या तोंडावर बांधली गेली होती. ताई अजूनही जीवाच्या आकांताने तडफडत होती. गोर्‍या ताईला तर आज्जीही नव्हती. होती का? नव्हतीच बहुतेक. चम्या ताडकन्‌ उठून बसला; दुसर्‍याच क्षणी गोधडी भिरकावून घराबाहेर धावला. एक पांढरा राजा पतंग गोते खात होता, असहाय्य फडफडत होता. वारा त्याला वाट्टेल तसा भिरकावत होता. शुभ्र गुलाबाच्या पाकळ्या न्‌ पाकळ्या फाटत चालल्या होत्या. चम्या जीव तोडून धावत होता. शेवाळलेल्या चिकट पाण्याच्या ओहोळावरून सराईत उडी मारून चम्या पुढे धावला. संन्याशाच्या झोपडीची धुमसणारी आग चम्याला दुरूनही व्यवस्थित दिसली. आगीच्या धगीसोबतच त्याच्या बाबांच्या चिरंतन किंकाळ्या ऐकू येत होत्या. ह्या सगळ्यातही सरांनी लिहून दिलेला अजून एक शब्द चम्याला आठवला. चम्याचे पाय लटपटले. तो क्षणभर थांबला. संन्याशीबाबा खोटं बोलले. सगळ्यांचंच अडतं एकमेकांशिवाय… त्याने आगीकडे पाठ फिरवली. कसलातरी निश्चय केला आणि पुन्हा दादाच्या लायब्ररीकडे धाव घेतली. लायब्ररी जसजशी जवळ येऊ लागली तसे त्याचे पाय पुन्हा लटपटू लागले. त्याने भिंतीआडून डोकावून पाहिलं. काल त्याच्या कानाखाली मारणारा तो तिथेच बाहेर बसून सिगरेट पेटवत होता. चम्याला सिगरेटच्या वासाने कसंतरीच होत असे. चम्या लहान असताना त्याचे बाबा एकदा सिगरेट पिऊन घरी आले होते. बाबांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं खरं पण चम्याने लगोलग स्वतःला त्यांच्यापासून सोडवलं; आणि मागच्या दारी जाऊन भडाभडा ओकला होता. त्यानंतर आजवर चम्याला फक्त गोडसरच वास येई… पण चम्याला आज काय होतंय तेच कळत नव्हतं. चम्या धावतच त्याच्यासमोर पोचला आणि त्याच्या काहीही लक्षात यायच्या आत, त्याला सिगरेट फुंकणार्‍याला ढकलून दिलं. चम्याच्या धक्क्याने हातातली जळती काडी त्याच्या डोळ्यात गेली. तो आरडाओरडा करत खाली पडला. पांढर्‍या पतंगाला वादळी वार्‍यातून जरा श्वास घेत आला… एव्हाना शुभ्र गुलाबाच्या पाकळ्या मात्र फार उरल्या नव्हत्या.. चम्या आत आला. सफारी सूटमधले दोन पाय पलंगाशी झटापट करताना त्याला दिसले. तिकडूनच कुठूनतरी ताईचा दाबला गेलेला आवाज येत होता. चम्या आत आल्यासरशी सफारी सूटमधल्या पायांकडे धावला आणि त्याने पायाला कडकडून चावा घेतला. प्रतिक्षिप्त क्रियेनुसार त्या माणसाने एक शिवी हासडत तो पाय झाडला. चम्या मागे फेकला गेला. डोकं जमिनीवर आपटून अगदी सणकून निघालं. अचानक त्याला ताईच्या किंकाळ्या जोराने ऐकू येऊ लागल्या… गावगुंडानं तिला एकच कानाखाली ठेवून दिली. घाव वर्मी बसला. नाकातोंडातून रक्त टपकू लागलं. चम्या उभं रहायचा प्रयत्न करत होता. तोल जात होता. त्याला मधेच वाटलं आता देव ताईला मिठीत घेईल. गावगुंडाने तिचे केस धरून तिला खाली पाडली, थुंकला आणि मागे वळला.
पांढर्‍या पतंगाला मोठ्ठी खोक पडली होती. शुभ्र गुलाबाचं देठ उरलं होतं निव्वळ. ते ही वार्‍याच्या उन्मत्त झोताने कुठेतरी उडवून नेलं. देठ भिरभिरत खाली येऊन विस्तीर्ण गटारात पडलं. पतंगाला आकाश खुणावत होतं. वारा जुमानत नव्हता. पडलेली खोक सहन होत नव्हती. पांढरा राजा पतंग खाली येऊ लागला. मांज्यात कुणी पक्षी अडकला का कोण जाणे. तो पतंग शेवटच्या क्षणी उलटापालटा होऊन विस्तीर्ण गटारात विलीन झाला.
इकडे लोण्याच्या रडण्याला अंत नव्हता.

समाप्त

आल्हाद महाबळ

 

 

 

4 thoughts on “चम्या -३”

 1. ….मी निष्प्रभ,
  ‘इकडे लोण्याच्या रडण्याला अंत नव्हता.’ हे जणू चटकावणारं आहे ….. ‘अनएण्डिंग’ होतं सारं,
  कल्पना होतीच असं काही होण्याची.
  एकटी म्हणजे नीती
  वळू म्हणजे माणसांची ऐतखाऊकी अन् वळत म्हणजे आपले नायक चम्या
  गंगा ही भारतीय संकल्पना आहे (मतमतांतर आहेत याबद्दल, तरी सांगतो कधी), नीट सुचवून आता हे लगेच मांडले, नस्ता क्षीण लावून दिला हा तू डोक्याला आता; बाकि तुला तर माहितीए…
  जाऊ दे; ह्यांग ओवर चालेल दोन-चार दिवस, मग ठीक होईल परत…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s