गुड नाईट!

दिवसभराचा कामाचा थकवा आणि मग भयाण ट्रॅफिकमधून घरी येईपर्यंत डोक्याचे चोवीस वाजलेले असतात आणि घरात पाऊल टाकल्या टाकल्या त्यात शिरते ती भयाण शांतता. बाथरूममधला नळ जोर लावून अगदी घट्ट बंद करूनही दिवसभर तसाच टपटपत राहिला असतो. ह्या त्रासिक आवाजाशिवाय सगळीच शांतता. मी बाथरूममधे शिरतो. थेंबाथेंबांनी बादली अर्धी भरलेली असतेच. तिच्यात दोन्ही पाय खुपसून उभा रहातो. घामट तळपायांवरती थंड पाण्याचा स्पर्श अनुभवत डोळे मिटून घेतो. मग उगाच क्षणभर आपण बादलीत लावलेलं झाड आहोत आणि आपल्याला आता उभ्या उभ्या वाढायचं आहे असं फिलींग येतं. मग मी बादलीतून बाहेर पडतो. बादलीतलं पाणी फेकून देतो. आणि बादली पुन्हा थेंबा थेंबाने भरायला लावतो.
जसे घामट पाय तसेच घामट कपडे. घामट शरीर. घामट मन… घामट मनाची फक्त तेवढी शिसारी येते. या मनाला एकदा चांगलं डेट्टॉलमधे बुचकळून धुतलं पाहीजे. अजूनही आजूबाजूला शांतता आहेच दाटीवाटीनं भरलेली; इतकी मी काही काळापूर्वी माणसांच्या समुद्रात होतो यावर माझाच विश्वास बसू नये. मग मी मोबाईल काढतो. त्यावर एन्रिक इग्लेशिअस लावतो. बघूया त्यानंतरी शांततेला काही रोमॅंटिक धुमारे फुटतात का… मग शांततेला रोमॅंटिक धुमारे फुटतात आणि ती येते. मी फॅन फुल्ल स्पीडवर सोडून गादीवर लोळलोय. ती येते. माझ्या गालावरून हलक्याने हात फिरवते. मी तिला कुशीत घेतो. मनात अडकलेलं, डोक्यात भिरभिरणारं जे सगळं मला बोलायचं होतं ते तिच्याकडे आपोआपच जाऊन पोचतं. ती माझा हात हातात घेते. मी तिला आय लव्ह यू म्हणतो… थोड्या वेळानं, मी माझ्याच हातात धरलेला माझाच हात माझ्याच हातातून सोडवतो. गादीवरून उठतो.
आणि स्वयंपाकाला लागतो. जेवतो. आता कुणाचंच कुणाविना काहीही अडत नसल्याने मी ऑनलाईन जाण्याचा फंदात पडायचं अजून एका रात्रीसाठी टाळतो आणि आडवा होतो. उद्या करायचं काम डोक्यात पुन्हा घुमू लागतं. त्यातच कवितेच्या दोन ओळी सुचतात पण लगेच कुठेतरी विरून जातात. आता पुन्हा लवकर काही सुचणे नाही. मला उगाच वाईट वाटतं. मी कूस बदलतो. पुन्हा तिला बोलवू पहातो. ती येत नाही. मग डोक्यावरून गच्च पांघरूण घेतो. आणि झोपून जातो.

गुडनाईट!

2 thoughts on “गुड नाईट!”

  1. “मग उगाच क्षणभर आपण बादलीत लावलेलं झाड आहोत आणि आपल्याला आता उभ्या उभ्या वाढायचं आहे असं फिलींग येतं”

    हे म्हणजे उगाच “तो जिंदा हो तुम” सारखं

  2. आपल्यासारख्या घरापासून दूर एकटा राहणाऱ्या प्रत्येक ‘यप्पी’ची रात्र थोड्याफार फरकानं अशीच सुरु होते – संपते!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s