युवर्स फेथफुली

तशी छोटीशीच होती दिसायला ती. तिचे केस मात्र लांबसडक. तिचा इवलासा चेहरा हरवून जाई कितीतरी वेळा तिच्याच केसांत. नाक मात्र छान सरळसोट, टोकदार होतं. त्याला राहून राहून वाटे तिला तिच्या सर्रळ नाकाला शोभेलसा रोल मिळालाच नाहीये अजून. आणखीन एक होती, नकटी. तिच्याकडे टक लावून बघताना तो तिच्या चेहर्‍यात नक्की काय बघतोय हेच त्याला कळत नसे. पण तिचं नकटं नाक आणि कसलंही विशेषण लागू नसणारा गोल चेहरा त्याची नजर बांधून ठेवी हे मात्र खरं. तिसरी इतरांच्या मानाने जरा जाड म्हणण्याइतपत भरलेली होती. अर्थात तिला असं जाड बिड म्हटलेलं त्याला खपायचं नाही. त्याच्या दृष्टीकोनातून ती परीपूर्ण होती.

त्याच्या अवतीभवती मिट्ट काळोख होता आणि त्याच्या काचकिरड्या खोलीत तो एकटाच होता. तिघींचे त्याने वेळोवेळी शोध शोधून मोबाईलमधे अगदी पासवर्ड प्रोटेक्टेड फोल्डरमधे ठेवलेले ते अगणित फोटोज काढून पहाणं हाच त्याचा एकमेव विरंगुळा उरला होता. त्याने जड निश्वास सोडला. सकाळचा गजर लावला तशी त्याच्या अतीस्मार्टफोनने एकूण झोपेची वेळ मोजून सांगितली; वट्ट पाच तास आणि सव्वीस मिनीटं. तो वैतागला. त्याने मोबाईलला एक कचकचीत शिवी मनातल्या मनातच हासडली आणि कुशी बदलून झोपला.

चौथी मात्र त्याच्या आयुष्यात, त्याच्याच ऑफिसमधे होती. ती सारखी काही ना काही कारण काढून त्याच्याशी बोलायला येई. तो बिझी असल्याचं भासवत कॉम्प्युटर स्क्रीनवरून नजर न काढता तिला उत्तर देई. मग ती उगाचच त्याला ई-मेल करे. तिला त्याची युवर्स फेथफुली असं लिहीलेली ऑटो सिग्नेचर वाचायला आवडे. ती कशी दिसते? पंजाबी ड्रेस, कधी कधी फॉर्मल्स, गळ्यात आयडी कार्ड आणि एक जुनाट वाटणारं ग्रीपर पेन हातात. पण ती कशी दिसते? त्याने नकट्या नाकाभोवती चबी फेस बांधून त्यावर लांबसडक केस लावून पाहिले; पण काही समाधान होई ना… तिचा आवाज मात्र ऐकत रहावा असा आहे. कधी कधी उगाचच तिच्या प्रश्नांना गोल गोल फिरवून उत्तरं देतो तो. तिने अजूनच काहीबाही विचारत रहावं म्हणून. तिला कळत असेल का ते? एकदा असंच विविध क्लृप्त्या लढवत तिच्याकडे न बघताही संवाद पुढे जाईल असं बोलण्याइतपत तिला चिडवत असताना ती एकदम जवळ आली होती. तो मुद्दामून वेगात टायपिंगचं नाटक करू लागला. तिने त्याच्या कीबोर्डवर बरोब्बर मधे एक एक्लेअर ठेवली आणि ती निघून गेली होती.

तो चमकला. अर्धवट झोपेतून उठून बसला. त्याने वेळ पाहिली. त्याला झोपून जेमतेम दीड मिनीटं होत होती. आता पुढचे पाच तास आणि साडेचोवीस मिनीटं कशी जाणार? तो पुन्हा आडवा झाला. अवतीभवतीच्या मिट्ट काळोखात त्याचे टक्क उघडे डोळे. नकट्या नाकाभोवती चबी फेसभोवती लांबसडक केस अशी ती दिसत नाही तर दिसते तरी कशी? त्याला काही आठवेच ना? तो पुन्हा झोपला. एखाद्‍ मिनीट दिड मिनीट झालं असेल नसेल त्याच्या कानाशी गजर किंचाळला. आजही ऑफिसमधे भेटेलच. नेहेमी तशी लवकरच येते आपल्या; असा तिच्याबद्दल स्वतःशीच विचार करता करता त्याला ऑफिसातली तिची जागा, तिची खुर्ची, तिचा पी.सी., प्रिन्टस्क्रीनची की तुटलेला तिचा कीबोर्ड असं सगळं सगळं आठवलं, फक्त ती सोडून. त्याला आठवलं एकदा ऑफिसच्या कार्यक्रमात तिने गाणं म्हटलेलं. मग ऐनवेळेस महत्वाच्या मिटींगला बॉस पोहोचू शकला नाही म्हणून आख्खं प्रेझेंटेशन स्वतः एकटीनं पार पाडलेलं. त्याच्यानंतर जॉईन होऊनही त्याच्यापेक्षा जास्त अप्रेझल तिनं घेतलं होतं तेव्हापासून मात्र मग तो तिला टाळू लागला होता. तसा शॉव्हिनिस्ट नव्हता तो, पण शहाणं वागणं त्याला अनेकदा जमायचंच नाही. त्याचा हा शहाणपणाच्या बाबतीतला लोच्या ओळखूनच मग ती एक्लेअर देऊन गेली होती का? एवढं सगळं त्याला आठवलं पण ती आठवली नाही. पण मग याहून वेगळी ती आठवायची राहिली तरी काय?

ऑफिसमधे पोचला तसा पी.सी चालू करून त्याने कॉफी मशीनकडे मोर्चा वळवला. ती एव्हाना कामात गढली होती. कॉफी मशीनकडे जाता जाता एकमेकांना फॉर्मली गुड मॉर्निंगून झालं. कपात साखर टाकल्या न टाकल्यासारखं केलं आणि कप मशीनमधे ठेऊन त्याने एस्प्रेसो सिलेक्ट केलं. कॉफीचा कडूशार वास आजूबाजूला दरवळला. तो क्षणभर थबकला. अजून एक कप घेतला. त्यात चांगली दोन चमचे साखर ओतली. कप मशीनमधे ठेऊन कॅपुचिनो सिलेक्ट केलं. ती कशी दिसते त्याचं उत्तर त्याच्या मनात हळूहळू तयार होत होतं. त्याने कॅपुचिनोचा कप हलकेच तिच्या बाजूला ठेवला. “चीअर्स!”, तो त्याच्या डेस्ककडे परतला. तिने त्याला छानशी स्माईल दिली. त्याने अनरेड मेल्स तसेच ठेवून आधी तिच्यासाठी एक ई-मेल कम्पोज केला, “युवर्स फेथफुली” इतकाच!

आल्हाद महाबळ
२०-३-१४

5 thoughts on “युवर्स फेथफुली”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s