Entry for April 25, 2006

माझे हे कॉलेजाचे शेवटचे वर्ष. म्हणून ठरवलं यावर्षी (तरी) भरपूर अभ्यास करावा आणि सर्व मित्रांसोबत सुट्टीकालीन शिकवणी वर्गात (म्हंजे summer vacation batch हो) नाव घालून आलो…

हुश्श..!! आलो एकदाचा घरी..

रोज दिवसाअखेरीस असा थकून गेलेला असतो मी. मित्र-मैत्रिणी असतातच सोबत; म्हणून काय ३-३ तास त्या खचाखच भरलेल्या वर्गात एका आणि एकाच ठिकाणी बसून काढायचे. छ्या, अगदीच नैया पार होऊन जाते बघा. आणि भरीस भर म्हंजे जोडीला अभ्याससुद्धा करायचा असतो. काय करणार, एका डोळ्याने शेवटच्या वर्षी मिळवण्याच्या उच्चप्रथम श्रेणीची स्वप्ने आणि दुसर्‍या डोळ्याने फळ्यावरची रुक्ष आकडेमोड वहीत उतरवताना दिवस संपतो. म्हंजे कसा……………………………..असा..-

मी: (सख्ख्या शेजारी मित्राला) ए, काल कॅरेरा जीटी चालवली…

मंदार: काय म्हणतोस जिंकलास मग?

मी: नाहीतर काय! च्यामारी माझ्याहून बेश्ट ड्रायव्हर या जगात नाय…

आम्ही दोघेही वरील किंवा कुठलीही चारचाकी फक्त संगणकावरील ‘वेगाची गरज: हवीहवीशी'( Need for Speed: Most Wanted) या खेळामध्येच चालवतो. ह्याच दळभद्री क्षणी मी मग एका अतिकटू सत्याच्या भक्ष्यस्थानी पडलो. ते म्हणजे मी आणि शिक्षकमहाशय दोघंही वेगवेगळ्या समस्या सोडवत आहोत.

मी: अरे एक गोष्ट येतेय का तुझ्या लक्षात? (त्याच्या उत्तराची वाटही न बघता मी बडबडतो) मी तर कॅरेरा नुसतीच चालवली, पण मालपाणी तर कॅरेराच्या स्पीड ने अकाउंटंन्सी करतो.

हा मालपाणी, डिग्र्यांची (पदवी पेक्षा डीगरीच जास्त ग्रामीण वाटतं बोवा!) लांबलचक माळ गळ्यात टाकून फिरणारी एक ६ फुटी गुढी आहे. गुढीच्या कडुनिंबाची चव जशी जिभेवर रेंगाळते ना तसाच मालपाणीने शिकवलेला माल; म्हंजे अभ्यास डॉक्याच्या भायेर म्हणून येत नाही.

Advertisements