चम्या -१

संक्रांतीचे दिवस होते. पतंगबाजीला नुसतं उधाण आलं होतं. आकाश त्याचा निळा हा एकमेव रंग सोडून रंगबेरंगी झालेलं भासत होतं. चम्याची शाळा यावर्षीपासून दुपारची झालेली होती. त्यामुळे गडी आनंदात असे. आता सकाळच्या क्रिकेट ह्या एककलमी कार्यक्रमाऐवजी पतंग आणि पतंगांचीच चलती होती. पलिकडच्या कॉलनीतल्या पोरांचे दोन चार पतंग कापून ढील देत देत हळूवारपणे पतंग लोण्याच्या हातात सोपवत चम्या दूर झाला. लोण्याच्या आई कधी वर आल्या आणि कधी थालिपीठं ठेऊन गेल्या त्याला इतका वेळ काहीही कळलं नव्हतं. थालिपिठांवरचं वितळलेलं लोणी बघताच त्याला भुकेची जाणीव झाली आणि तो हादडायला बसला. लोण्याचं लक्ष होतंच. तो करवादला, “संपवू नकोस हगर्‍या. तुला मला तेवढंच आहे.” चम्याचे चार घास खाऊन होत नाही तोवर लोण्याने जणू मास्टरस्ट्रोकच खेळला. जेमतेम अर्ध्या सेकंदाच्या झोंबाझोंबीत पलिकडल्या कॉलनीतल्यांचा ‘राजा’ लोण्याने कापला… दुसर्‍याच क्षणी ‘राजा’ हस्तगत करायला चम्या रस्त्यावर आणि मोठ्ठी मिशन पूर्ण केल्याच्या आविर्भावात लोण्या थालिपीठाचे लचके तोडायला बसला.
पलिकडल्या कॉलनीतल्यांशी चम्याच्या कॉलनीवाल्यांचं वैर. दोन कॉलन्यांच्या मधून वहाणारं, एका शहरातलं सांडपाणी दुसर्‍या शहराजवळ नदीत नेऊन सोडणारं विस्तीर्ण गटार ही त्यांची बॉर्डर. हिमालयातून वहात येणार्‍या बारमाही नद्यांसारखं हे गटारही बारमाही; सदा तुडूंब भरून वहात असे. पावसाळ्यात तर अगदी हिरवंगार होऊन जाई. पाण्यावर तरंगणारं ब्राईट हिरवं शेवाळ, गटाराच्या कॉन्क्रिटी भिंतींवर उगवलेलं बॉटल ग्रीन रंगाचं शेवाळ आणि त्यामधून डराव डराव करत उड्या मारणारे बेडूक असा छान नजारा असे. आत्ताही पलिकडल्या कॉलनीवाल्यांचा ‘राजा’ हस्तगत करायला चम्या धावला खरा पण ‘राजा’ पलिकडल्या कॉलनीवाल्यांच्या आणि चम्याच्याही हातात न लागता मधल्या गटारावरच काही काळ फडफडला आणि गटारात पडला. पलिकडच्या कॉलनीतली पोरं निघून गेली पण हा पतंग असा एकदम गटारात का गेला हा प्रश्न चम्याच्या मनात मात्र घर करून बसला. पण गटाराची भिंत अजून तरी चम्याहून उंचच होती. तितक्यात चार पावलं पलिकडे कॉलनीतल्याच कुणी काकूंनी भिंतीच्या एका तुटलेल्या पॅचवरून कचर्‍याची पिशवी भिरकावली आणि चम्याचं लक्ष तिकडे गेलं. इथून मात्र चम्या टाचा वर करून का होईना पण पलिकडे गटारात पाहू शकत होता. काकूंनी फेकलेली पिशवी गटारात रुतून बसलेल्या इतर अनेक पिशव्यांसोबत तादात्म्य पावली होती. तादात्म्य हा शब्द मराठीच्या सरांनी परवाच लिहून दिला होता. आता चम्याला त्याचा वाक्यात उपयोगही सुचला आणि तो खूश झाला. मग चम्याला परत ‘राजा’ आठवला. राजा एव्हाना ओला होऊन पार पाघळला होता. ‘राजा’चा मांजा वेडावाकडा पसरला होता. त्यात चम्याला काहीतरी अडकलेलं दिसलं. चम्याने त्यावर एक खडा उचलून मारला. ते अडकलेलं तिरपं झालं. ‘राजा’नं पडता पडता एखाद्या कबूतराचा पंख कापला होता हे चम्याच्या लक्षात आलं. “आणि कबूतर?” ह्या स्वतःच्याच मनाला पडलेल्या प्रश्नाला “मेलं असणार.” असं उत्तर स्वतःच देऊन तो संथ गतीने लोण्याकडे परत निघाला.
इकडे लोण्यानं सगळी थालिपीठं संपवली होती. आणि उरलासुरला बोटभर लोण्याचा गोळा तो चाटत बसला होता. चम्यानं त्याला बेसावध पकडून लोण्याचा गोळा एकाच घासात गट्टम्‌ केला आणि थालिपीठं न ठेवल्याबद्दल निषेध नोंदवला, “लोण्या साल्या तूच हगर्‍या आहेस. थालिपीठ असो नाहीतर कोमडीचा रस्सा… तू साल्या हावरटासारखंच करतोस. अर्धं थालिपीठ ठेवायला काय होतं?”. “सोड बे. मिळतंय तेवढं खाऊन घ्यावं.” लोण्या बरळला आणि खाली निघून गेला.


नेहमीप्रमाणे चम्या संध्याकाळी शाळेतून आला आणि उरलेला डबा संपवू लागला. एव्हाना चम्याच्या आई आणि आज्जीच्या सिरीयल्सची वेळ झाली होती. मग एकमेकांविरुद्धची कटकारस्थानं ऐकत चम्या नेहमीप्रमाणे अभ्यासाला बसला. एक रोजचा डबा शाळेतच संपवून न येणं ही गोष्ट सोडली तर अभ्यासासाठी चम्याच्या आईला चम्याला कधीच ओरडावं लागलं नाही. पण आज मात्र चम्या वैतागलाच. सिरीयलमधे झापझूप असे आवाज काढत प्रत्येकाचे क्लोजप मारणं सुरू झालं की इकडे चम्याचा हातचा आज हमखास चुकत होता. सलग तिसर्‍यांदा हातचा चुकल्यावर चम्याचा गणितातला उत्साह मावळला. आणि तो मराठीकडे वळला. मराठीकडे वळेवळेपर्यंत मनात विज्ञानाचा विचार येऊन गेला पण नेहमीप्रमाणे न केलेले प्रयोग सरांनी प्रयोगवहीत लिहून आणण्याचा गृहपाठ आज दिलेला नाहीये हे ही त्याचा लगेच लक्षात आलं. तो मनातल्या मनात ‘हुश्श’ फार जोरात बोलला असावा; कारण आज्जीने लगेच ‘अभ्यास कर रे’ म्हणून दटावलं. मराठीचं वही पुस्तक उघडून धड्याखालचे प्रश्न सोडवू लागला. तादात्म्य, सैरभैर, फुलपंखी, आशिर्वचने असे पुस्तकातले शब्द आणि सुखाला चूड लावणे, होत्याचं नव्हतं करणे, किंमत चुकवणे असे सिरीयल्समधले संवाद त्याच्या डोक्यात एकदमच घोळू लागले. एकूणच तो मराठीच्या अभ्यासात रमला.
वेळपरत्वे चम्याचा अभ्यास पूर्ण झाला. चम्या आतल्या खोलीत येऊन जेवायला बसला. चम्याचं जेवण होत आलं होतं आणि त्याला तो परिचित गोडसर वास आला. नेहमीप्रमाणे डबल शिफ्ट आणि शीण घालवायला ठरलेली आचमनं करून चम्याचे बाबा आले. “अभ्भास झाला का रे?”, त्यांनी विचारलं. “हो बाबा.”, चम्या उत्तरला. “जाय झोप मंग आता.” इतकं बोलून बाबा जेवायला बसले. आजी टिव्ही पहाता पहाता कधीच झोपली होती. चम्या बाहेर पडला. पलिकडच्या कॉलनीमागे चंद्र उगवला होता; आणि चम्याच्या डोक्यावर मिणमिणता पिवळट स्ट्रीटलाईट. पलिकडच्या कॉलनीत एका मोठ्या बिल्डींगचं काम चालू होतं. लोण्याच्या मते तिथे एक मोठी लायब्ररी होणार होती. अधिक वाचनासाठी म्हणून धड्याखाली नावं दिलेली पुस्तकं तिथे खरंच मिळतील असं त्याला मनापासून वाटलं आणि तो खूश झाला. त्यांच्याही कॉलनीत एका समाजसेवकानं छोटीशी लायब्ररी सुरू केली होती. सोबतीनं दारूबंदी, सार्वजनिक संडास असे अनेक उद्योग तो कॉलनीत करत असे. त्या लायब्ररीतली हातिमताई, इसापनिती, अकबर-बिरबल वगैरे सगळी पुस्तकं चम्याने कधीच वाचून काढली होती. पुढे तो समाजसेवक अचानक मेला आणि चम्याची नव्या पुस्तकांची आशाही मावळली.
चम्या परत घरी येऊन गाढ झोपेपर्यंत “मरतात मरतात म्हणजे होतं तरी काय?” हाच एक प्रश्न घोळत होता.


आज लोण्या दुप्पट उत्साहाने पतंग उडवत होता. त्याच्या आईनं आणून ठेवलेल्या टोपलीभर जळगावी बोरांकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं. चम्या मात्र गप बसून एकेक बोर तोंडात टाकत होता. बोराच्या बीचं मिसाईल तोंड वर करून चम्याने फुक्‌ करून उडवलं; ते त्याच्याच शर्टावर डाग पाडून गच्चीखाली घरंगळत गेलं. चम्या वैतागला. पलिकडच्या कॉलनीतल्यांच्या अनेक राजांसमोर आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून लोण्याने त्याचा एकमेव पतंग गपचीप लॅण्ड केला. विमान उडवण्याला टेक ऑफ आणि परत जमिनीवर उतरवायला लॅण्ड करणं म्हणतात हे ज्ञान चम्यानेच त्याच्यासमोर एकदा पाजळलं होतं. आणि उसन्या ज्ञानाचा यथार्थ उपयोग लोण्या नेहमीच करत असे.
आज मात्र चम्याचं लक्षण ठीक नव्हतं. बोरावर पडलेल्या डागाचं निरीक्षण करत चम्याने उपदेश केला, “लोण्या आपण कोमडी मारून नाय खाल्ली पायजे.”. “मंग मारायची तरी का?” लोण्यापण येडचापच. “अरे मारायचीच नाही असं म्हणतोय.” चम्या. “मग खायची कशी?” लोण्या. “हगर्‍या कधीतरी खाणं सोडून दुसरा विचार कर… लोण्या आपण कोमडी मारणार. म्हणजे ती मरणार. ती मरणार म्हणजे काय होणार ते माहित नाही पण काहीतरी वाईटच होत असणार.” चम्याने विचार मांडलाच. “हो रे. मास्तर नुस्ती छडी हाणतात तेव्हा इतकं लागतंय. कोमडीला तर फारच लागत असेल रे!”, लोण्या चम्याच्या दृष्टीने फारच सेन्सिबल बोलला. चम्याने अगदी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं. “लागत असेल. पण किती?” चम्या. किती हा प्रश्न लोण्याच्या आयक्यूच्या प्रचंडच बाहेर होता. तो नुसताच त्याच्याकडे बघत बसला, डोळे मोठे मोठे करून.


आज शनिवार; चम्याची शाळा आज अर्धा दिवस होती. चम्या घरी आला तेव्हा देवळात वाती वळायला गेलेली आजीही अजून यायची होती. आजीला तिच्या समवयस्क मैत्रिणी तिथे भेटत. गावभरच्या बातम्या आजीला कळत तिथे. शिवाय आपापल्या सुनांच्या, नातसुनांच्या कागाळ्या आणि वाती वळणं ही दोन कामं आपोआपच होत रहात. तर चम्या घरी आला. आवरलं. आणि शहाण्यासारखा चहा बिस्कीट खायला बसला.
“आई, माणसं मरतात म्हणजे काय होतं?” चम्याला अगदीच राहवेना. चम्याच्या आईने क्षणभर त्याच्याकडे टक लावून बघितलं आणि म्हणाली, “मरतात म्हणजे देवाघरी जातात.”. “हूंऽ!” देवघरातल्या फोटोंकडे टक लावून पहात चम्या स्वतःशीच बोलला. “आई मरताना खूप दुखत असेल ना?”, चम्याचं कुतूहल ही एक अनेण्डिंग गोष्ट आहे. “आता मला काही अनुभव नाही रे बाबा, कधी कधी दुखतं खूप, कधी नाही.”, चम्याची आई उत्तरली. “हूंऽ”, पुन्हा देवघराकडे टक. देवघराकडे टक लावूनही नेहमी कळल्यावर वाटतं तसं ग्रेट वगैरे काही त्याला वाटेना. शेवटी टेबलाखालून बॉल काढून तो लोण्याकडे जायला निघाला. टेबलावर फ्रेम करून लावलेल्या आजोबांच्या फोटोकडे त्याचं खरंतर सवयीने लक्ष जायचंच नाही; पण आज गेलं. “आई, आजोबा पण मरून गेले का गं?”, पंधरा फुटावर असलेल्या आईसाठी चम्याचा तारस्वरात प्रश्न. “मरून गेले नाही देवाघरी गेले म्हणावं.” चम्याची आईसुद्धा मग ओरडलीच त्याला. “आजोबा देवाघरी गेले?” चम्याचा हळू आवाजात प्रश्न. “हो. गेले.”, आई. आईचा आवाज अचानक असा का बदलला ते चम्याला कळलं नाही. आई पुढे लगेच सावरून म्हणाली, “तू ही जा पळ आता खेळून ये दोन तास.”. “चम्या गधड्या काही वारले नाहीत हो तुझे आजोबा. फक्कड जिवंत आहेत चांगले.” आजीने घरात पाऊल ठेवता ठेवता चम्याच्या पाठीत उगाच धपाटा घातला आणि थकल्यासारखी खुर्चीत कलंडली. चम्या आजीचा धपाटा पडताच धूऽम पळाला तो थेट लोण्याच्या घराशीच थांबला.
“आई काय होतंय तुम्हाला? चक्कर वगैरे आली का? हे पाणी घ्या बघू आधी?”, स्वभाववैशिष्ट्यानुसार चम्याच्या आईला काळजीचं भरतं आलं. “काही चक्कर आलेली नाही. ठणठणीत आहे मी.”, आजी फणकार्‍यानं बोलली. आणि चम्याच्या आईच्या हातातलं ग्लासभर पाणी घटाघटा पिऊनच दम घेतला. आई काळजीनं बाजूची खुर्ची ओढून घेऊन तिथेच बसली. जरा वेळानं तिनं अगदी काळजीचा स्वर लावून विचारलं, “काय झालं आई?”. “सासरेबुवा आलेत तुझे.” आजी आजोबांच्या फोटोकडे नजर लावून म्हणाली. “सासरेबुवा? अहो पण ते तर… ?”, आई. “काही हरवले नाहीत का निघून गेले नाहीत; संन्यासाश्रम स्विकारलाय म्हणे.”, आजी. आईला पुढे काही बोलायची सवड न देता आजीच पुढे तावातावानं बोलू लागली, “गुरवाची बाई येते म्हणाली म्हणून थांबलो होतो तिच्यासाठी मंदिराच्या ओट्यावरच… बग हं कसं अस्तंय ते, देवाचं दर्शनही नव्हतं घेतलं. ही बाई येईनाच. शेवटी तिथेच बसल्याबसल्या वाती घेतल्या वळायला…”. “आई, सासरेबुवांचं सांगताय ना…” चम्याची आई. ” हो तेच गं. शेवटी गुरवीण आली एकदाची. कोणी नवीन संन्यासीबाबा आलाय म्हणे पारावर. आम्हीही गेलो तिच्याच पाठी. सगळी वस्तीच लोटलीवती.”, चम्याची आजी. “हं मग?” चम्याच्या आईला तर आता रहावेना. “पहाते तर काय… माझं कुंकूच की गं ते… संन्यासी होऊन बसलेलं!”, बांध आता पार फुटायला आला आजीचा. “अहो,…” आई जरा अडखळतच म्हणाली, “तुम्हाला वाटलं असेल फक्त, तसे दिसणारे दुसरेच कुणी असतील.”. “न्हाय गं”, आजी वसकन्‌ ओरडलीच, “अशी नमस्कार करायला गेले त्यांनी एकडाव पाहिलं माझ्याकडे अन् अस्सं लक्कन्‌ हललं की गं काळजात!”

चम्या -२

4 thoughts on “चम्या -१”

यावर आपले मत नोंदवा